(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi Meeting : सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत आज बैठक, पंतप्रधान राहणार उपस्थित
आज दिल्लीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.
PM Narendra Modi Meeting : यंदा देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या निमित्त देशात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. दरम्यान, आज दिल्लीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. ही बैठक आज दुपारी साडेचार वाजता राष्ट्रपती भवनात सुरु होणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त भारत सरकार (GOI) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अभियानांतर्गत देशभरात भव्य रॅली, पथनाट्य आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन देशभक्तीचा संदेश दिला जात आहे. या मोहिमे अंतर्गत भारत सरकारनं हर घर तिरंगा मोहिमेची हाक दिली आहे. त्याअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशवासियांनी घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमातून आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा टाकून देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये तिरंग्याचा फोटोही टाकला आहे. याशिवाय सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनीही आपला प्रोफाईल पिकला तिरंगा ठेवला आहे.
काँग्रेस अभियानात सहभागी मात्र....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर प्रमुख विरोधी असलेला काँग्रेस या अभियानात सामील झाली आहे मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर प्रोफाईल पिक्चरमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा तिरंगा घेतलेला फोटो टाकला आहे. नुकतीच पाटणा इथे भाजपच्या सातही आघाड्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकी झाली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना तिरंगा मोहिमेसाठी एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे. एकही घर तिरंग्याशिवाय राहणार नाही. देशवासीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हे अभियान चालवले जात असल्याचे भाजपनं म्हटले आहे.
दरम्यान, या मोहिमेला भारतीय सैन्याकडूनही पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच, ITBP च्या जवानांनी मसुरीमध्ये 12 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावला आणि भारतीय तटरक्षक दलाने पाण्याखाली तिरंगा फडकावला. त्याचा व्हिडिओही देखील प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: