Assembly Election Results 2023 : आज लोकसभेच्या सेमी फायनलचा निकाल; कोण सत्ता राखणार अन् कोण सत्ता गमावणार?
Assembly Election Results 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार आहे, हे आज काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
Assembly Election Results 2023 : लोकसभेची (Lok Sabha 2024) सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राजस्थान (Rajasthan Election Result 2023), मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Election Result 2023), छत्तीसगड ( Chhattisgarh Election Election Result 2023) आणि तेलंगणा (Telangana Election Election Result 2023) या चार राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर, मिझोरममधील मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये थेट निवडणूक आहे. तर, या राज्यात भाजप आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मतदारांचा आशिर्वाद मिळणार? (Madhya Pradesh Election Result 2023)
2018 मध्ये आलेली सत्ता काँग्रेसला 'ऑपरेशन लोट्स' मुळे गमवावी लागली. त्यानंतर काँग्रेसने सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. तर, भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज यांनी सुरू केलेली 'लाडली बहना' ही योजना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनंही रणनीती बदलत या योजनेला काट देणारी नारी सन्मान योजना देऊ असे म्हणत घोषणा केली. मध्य प्रदेशातली निवडणूक ज्येष्ठ नेते कमलनाथ सेंट्रिक केली. कमलनाथ यांनी सॉफ्ट हिंदुत्ववादी भूमिका घेत, शिवराज यांच्या नीतींचा विरोध केला. त्यातच राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा प्रचारात आणत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं. ऑपरेशन लोटस, आदिवासींचे हक्क आणि शिवराज यांच्या विरोधातील नाराजी याच मुद्द्यांना प्रचारात केंद्रस्थानी आणत काँग्रेसनं सत्तेसाठी मोठी दावेदारी उभी केली.
मध्य प्रदेशमधील एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Madhya Pradesh Election Exit Poll)
काँग्रेस - 125
भाजप - 100
बसपा - 02
एकूण जागा - 230
छत्तीसगडमध्ये 'काका' सत्ता राखणार? (Chhattisgarh Assembly Election Result 2023)
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल हे सत्ता राखणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचत काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि पाच वर्ष यशस्वीपणे सरकार चालवले. त्यामुळे केलेल्या कामाच्या जोरावर काँग्रेसला मतदारांचा कौल आपल्या पदरी येईल, अशी अपेक्षा आहे. तर, भाजपला मतदार आपल्या बाजूने वळणार असल्याचा आत्मविश्वास आहे. एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये चुरशीची लढाई असल्याचा अंदाज आहे.
छत्तीसगड एक्झिट पोल एबीपी सी वोटर (Chhattisgarh exit poll ABP C Voter 2023)
काँग्रेस - 41 ते 53
भाजप - 36 ते 48
इतर - 1 ते 4
एकूण - 90
तेलंगणामध्ये परिवर्तनाची लाट? (Telangana Assembly Election Result 2023)
तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे. सध्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष TRS ला 2018 मध्ये (पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती वरून बदलून 2022 मध्ये भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले) सर्वाधिक 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. सरकारविरोधात असलेल्या रोषाचा फायदा आपल्याला होईल असा काँग्रेसचा होरा असून निवडणूक प्रचारात पक्षाने मोठी ताकद लावली होती. तर, राज्यात तीन खासदार असलेल्या भाजपनेदेखील जोर लावला आहे. भारत राष्ट्र समितीने सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली.
तेलंगणा एक्झिट पोल (Telangana Exit Poll 2023)
एबीपी सी वोटरच्या अंदाजानुसार तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना सत्ता टिकवणं आव्हानात्मक आहे. काँग्रेस सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
बीआरएस (BRS) - 46
काँगेस - 57
भाजप - 09
इतर -07
एकूण = 119
राजस्थानमध्ये गेहलोत जादू करणार? (Rajasthan Assembly Election Result 2023)
राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदल होत असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जादूगार म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जादू दाखवणार की काहीशी विस्कळीत असणारी भाजप बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या 25 जागा या राज्यात आहेत. त्यादृष्टीने राजस्थानचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया, राज्यवर्धन सिंह राठोड, गोविंद सिंग दोतसारा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने राजस्थानची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी उमेदवारांसाठी प्रचार केला.
एक्झिट पोलमुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपकडे सत्ता जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजस्थान एक्झिट पोल (Rajasthan Exit Poll ABP C Voter)
भाजप - 108
काँग्रेस - 81
इतर - 14