Election 2021 | बंगाल आणि आसाम पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी तयार, कडक सुरक्षा व्यवस्थेत 77 जागांसाठी आज होणार मतदान
पश्चिम बंगाल (West Bengal) आणि आसाममध्ये (Assam) पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार असून 77 जागांसाठी जवळपास 1.54 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांत शनिवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एकू्ण 77 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांचा विचार करता शनिवारी एकूण 1.54 कोटीहून जास्त मतदार आपला हक्क बजावतील.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील अनेक जागा या पूर्वीच्या नक्षलग्रस्त असलेल्या जंगमहल प्रदेशातील आहेत. त्यामुळे या भागात सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. या भागातील मतदानावर अनेक पक्षांचे तसेच निवडणूक आयोगाचे लक्ष असेल. भाजपला या परिसरातून चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. 2019 साली झालेल्या या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या भागात मोठ्या प्रमाणात म्हणजे सुरक्षा दलांच्या जवळपास 684 कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये एकूण 10,288 मतदान केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त महत्वाच्या ठिकाणी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाच्या नियमांचे होणार पालन
पहिल्या टप्प्यात पुरुलियाच्या 9, बांकुडाच्या 4, झाडग्रामच्या 4, पश्चिमी मेदिनीपुरच्या 6 आणि इतर सात महत्वाच्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. हा परिसर भाजप नेते शुभेन्दू अधिकारी यांचा गड मानला जातो. मतदानाच्या दरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या 30 जागांपैकी, भाजप आणि तृणमूल प्रत्येकी 29 तर काँग्रेस-डावे-आयएसएफ आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, भाजपा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह , राजनाथ सिह , बिहारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य नेत्यांनी या 30 मतदारसंघात अनेक सभा घेतल्या आहेत.या पहिल्या टप्याच्या मतदानात दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..
आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विधानसभा अध्यक्ष हिरेंद्रनाथ गोस्वामी आणि आसामचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रिपून बोरा यांचे भवितव्य पणाला लागले आहे. तसेच सत्ताधारी भाजपचे अनेक मंत्री आणि आसाम गण परिषदेचे काही नेत्यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी मतदानाची वेळ एक तासांनी वाढवण्यात आली असून ती सकाळी सात ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल.
संबंधित बातम्या :