WB Election : महाराष्ट्राप्रमाणे पश्चिमबंगालमध्येही आयपीएस अधिकाऱ्यांची चर्चा!
WB Election : पश्चिम बंगालच्या डेबरा मतदारसंघात भाजप आणि टीएमसी यांच्यात दोन माजी आयपीएस अधिकारी निवडणूक रिंगणात आहेत. टीएमसीने माजी आयपीएस हुमायून कबीर यांना तिकिट दिले आहे तर भाजपने माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना उमेदवारी दिली आहे.
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा आता कुठे रंगात आली आहे. मोदी आणि दिदी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात सत्तावीस तारखेला 30 मतदार संघात मतदान होत आहे. यात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरणार आहे ती म्हणजे डेबरा मतदारसंघात. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील डेबरामध्ये दोन माजी पोलिस अधिकारी आमनेसामने आहेत.
महाराष्ट्रात सध्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांवरुन महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. भाजपने हा मुद्दा उचलून धरत सरकारला कोंडीत पकडले आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही दोन आयपीएस अधिकारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. एक सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून उभाय तर दुसरा भाजपच्या गोटातून निवडणूक लढत आहे.
माजी आयपीएस अधिकारी हुमायुन कबीर यांनी चंदननगरच्या पोलिस आयुक्तपदावरून हटविल्यानंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोलकातापासून 103 कि.मी. अंतरावर असलेल्या डेबरा येथून टीएमसीने त्यांना उमेदवारी जाहीर केली.
WB Election 2021 : सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही!
कबीर यांच्या शेवटच्या कारवाईत त्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली होती. चंदननगरमध्ये भाजपाचे नंदीग्रामचे उमेदवार सुभेन्दु अधिकारी यांच्या मेळाव्यात वादग्रस्त घोषणा देण्याच्या आरोपाखाली तिघांनाही अटक करण्यात आली. सुभेन्दू यांनी टीएमसी सोडली आणि निवडणुकीच्या घोषणेच्या अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला.
कबीर यांच्यासमोर भाजपने भारती घोष यांना उमेदवारी दिली आहे. भारती घोष या देखील माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती मानलं जायचं. त्यांनी सेवानिवृत्ती घेऊन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
WB Election 2021 ग्राऊंड रिपोर्ट : ममता की शुभेंदु... नंदिग्राम मतदारसंघात कोण मारणार बाजी?
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होईल. त्यानंतर 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होईल.