Assam | काँग्रेस 87 जागांवर निवडणूक लढणार, 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आसाममध्ये एकूण 126 विधानसभा जागांसाठी 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागणार आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसने आसाम निवडणुकीसाठी आपल्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये स्टेट यूनिटचे अध्यक्ष रिपुन बोरा आणि विधानसभेतील पक्ष नेते प्रतिपक्ष देवव्रत सैकिया यांचे नाव आहे. यामध्ये राजसभा सदस्य असलेले बोरा यांना गोहपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर सैकिया आपल्या सध्याच्या नजीरा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
आसाममध्ये काँग्रेसने अनेक लहान पक्षांना सोबत घेऊन 'महाज्योत' नावाची महाआघाडी केली आहे. त्यामध्ये एआययूडीएफ, बीपीएफ, माकपा, भाकपा आणि आंचलिक गण मोर्चा सामिल आहे. काँग्रेसच्या सूत्रांच्या मते, पक्ष एकूण 87 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आसाममध्ये एकूण 126 विधानसभेच्या जागांसाठी 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागणार आहे.
महिलांना सरकारी नोकरीमध्ये 50 टक्के आरक्षणाचे आश्वासन महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने आता आसाममध्ये महिलांना सरकारी नोकरीमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं आहे. तसेच महाज्योत आघाडीचे सरकार सत्तेत आलं तर राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी एका वेगळ्या मंत्रालयाची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही आपल्या जाहिरनाम्यात स्पष्ट केलं आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते असलेले खासदार गौरव गोगोई म्हणाले की, "काँग्रेस समस्यांवर उत्तर शोधणारा पक्ष आहे. आसाममध्ये सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामध्ये नागरिक संशोधन विधेयक, बेरोजगारी, महागाई आणि महिलांची उपेक्षा या सारख्या अनेक अडचणी आसाम समोर आहेत. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास येत्या काळात महिलांना 50 टक्के आरक्षण देणार आहोत."
आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघांसाठी 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 47 जागांसाठी 27 मार्चला, दुसऱ्या टप्प्यात 39 जागांसाठी एक एप्रिलला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 40 जागांसाठी सहा एप्रिलला निवडणूक घेण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख नऊ मार्च आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या 15 सदस्य आणि पंचायत समितीच्या 14 सदस्यांची निवड रद्द
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
