Ashadhi Ekadashi 2021 : मराठीत ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा; विठुरायाचरणी साकडं
Ashadhi Ekadashi 2021 : मराठीत ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या असून विठुरायाचरणी साकडंही घातलं आहे.
Ashadhi Ekadashi 2021 : आज आषाढी एकादशी. परंतु, यंदाही सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशी कोरोनाच्या सावटात पार पडत आहे. मानाच्या दहा पालख्यांनाच आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा पार पडली. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारं ट्वीट मराठीतून केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या वॉटरप्रूफ प्रतिमांचा अनावरण सोहळा पार पडला. सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिरही कुलूपबंद आहे. या वेळेचा सदुपयोग करीत मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहे. लॉकडाऊन लांबला तर जगभरातील विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे.