नवी दिल्ली :  हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat ) यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी तामिळनाडू येथील कुन्नूर येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा (Chopper Crash) अपघात झाला. यामध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचेही निधन आहे. हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 



कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी बचाव पथक पोहचले. परंतु, गंभीररित्या जखमी झाल्याने 13 जणांचा मृत्यू झाला. देशासाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे. 


देशाचे पहिले सीडीएस आहेत बिपीन रावत 
जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले सीडीएस आहेत. लष्कर प्रमुख पदावरून 31 डिसेंबर 2019 ला निवृत्त झाल्यानंतर बिपीन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बनले होते.  2016 मध्ये ते लष्कराच्या प्रमुखपदी रूजू झाले होते. बिपीन रावत यांना पूर्व सेक्टरमध्ये एलओसी, काश्मीर घाटी आणि पूर्वेकडील भागात काम करण्याचा चांगला अनुभव होता. शांतता नसलेल्या भागात काम करण्याच्या अनुभवावरून केंद्र सरकारने बिपीन रावत यांना 2016 मध्ये लष्कराच्या प्रमुख पदी नियुक्त केले होते. 


जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली झाला होता सर्जिकल स्ट्राईक
भारतीय लष्कराने 29 डिसेंबर 2016 रोजी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवादी स्थळे उद्धवस्त केली होती. विशेष बाब म्हणजे बिपीन रावत यांची लष्कराच्या प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ एका महिन्याच्या आतच सर्जिकल स्ट्राईक केला होता. हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले होते. उरीमध्ये भारतीय लष्कराच्या तळांवर आणि पुलवामा येथे सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतरच भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला होता.   
 
म्यानमार ऑपरेशनचेही बिपीन रावत यांनी केले होते नेतृत्व 
जून 2015 मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर 21 पॅरा कंमांडोंनी सीमा ओलांडून म्यानमारमध्ये NSCN- या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले. याचेही नेतृत्व कमांडर बिपिन  रावत यांनी केले होते.


 जनरल रावत यांच्या प्रमुख कामगिरी
रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले.  
2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016 ला सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. 
बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 2016 मध्ये सेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे. 
रावत यांची लष्कराच्य प्रमुख पदी झालेल्या निवडीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 आॅगस्ट रोजी लाल किल्यावरून केलेल्या भाषणात केली होती. 
 
 संयुक्त राष्ट्रात सेवा बजावत असताना, बिपिन रावत यांना दोनदा फोर्स कमांडरचा सन्मान प्रदान करण्यात आला. चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील पूर्व सेक्टरमध्ये त्यांनी पायदळ बटालियनचे नेतृत्व केले. त्यांनी राष्ट्रीय रायफल्स सेक्टर, काश्मीर खोर्‍यातील पायदळ विभाग आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.


संबंधित बातम्या 


Bipin Rawat Wife Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!


Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया


Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!


CDS Bipin Rawat : मोदी म्हणाले, सच्चा देशभक्ताला सलाम! अमित शाह म्हणतात, तुमचं शौर्य देश विसरणार नाही