मुंबई : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला, पण जे काही घडलं ती देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे असं देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार म्हणाले. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 


देशाचे माजी संरक्षणमंत्री शदर पवार म्हणाले की, "जनरल बिपीन रावत यांच्याशी  संवाद साधण्याची जबाबदारी मलाही मिळाली. सीमेवर जे घडलं होतं, त्याबाबत मला आणि ए के अँटोनी यांना रावत यांनी योग्य ब्रीफिंग केलं होतं. देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अखंड चिंता करणारा, अत्यंत शक्तीमान लष्करातील अधिकाऱ्याला आपण मुकलो.  याचं प्रचंड दुख आहे."


देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब
या घटनेची चौकशी होईल, अपघात कसा झाला ते समोर येईल असंही शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "हेलिकॉप्टर वापरलं ते उच्च दर्जाचं होतं, आता मानवी चूक होऊ शकते का हे आपण इथे  बसून सांगू शकत नाही. पण जे घडलं ते  देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे."


सैन्याच्या मनोधैर्यावर परिणाम नाही
शरद पवार म्हणाले की, बिपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे सैन्याला साहजिकच धक्का बसेल, पण त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही. देशाचा जवान देशाच्या रक्षणासाठी कायम उभा असेल." 


सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. बिपीन रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही, सच्चा देशभक्ताला सलाम! असं ते म्हणाले.   


संबंधित बातम्या :