(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी दोन पाकिस्तानी जवानांना टिपलं
भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमधील तंगधार परिसरात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आहे.
श्रीनगर : भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमधील तंगधार परिसरात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आहे. काल रात्री पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्यात झाला, ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिकानी कव्हर फायरिंगही केलं.
भारतीय लष्कराने प्रेस रिलीज जारी करत याबाबत माहिती दिली. काल पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेल्या पाकिस्तानी सेनेच्या त्या बंकर्सना भारतीय सेनेने निशाणा बनवलं आहे. घुसखोरांना कव्हर देण्यासाठी पाकिस्तानकडून काल कव्हर फायरिंग करण्यात आली होती. ज्यामध्ये मथुराचा जवान पुष्पेंद्र सिंहच्या डोक्यात गोली लागल्याने ते शहीद झाले होते.
भारतीय सेनेच्या कारवाईनंतर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून पाकिस्तानकडून भारतीय पोस्टवर गोळीबार सुरू आहे. सकाळपासूनचं तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
पाकिस्तान नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थितीत काही सुधार झालेला नाही. आज पाकिस्तान स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्त वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवानांना मिठाई वाटपही केलं. पाकिस्तान एकीकडे मिठाई खाऊ घालत आहे, तर दुसरीकडे गोळीबार करत आहे. यावर्षात आतापर्यंत सीमेवर 79 भारतीय जवान शहीद झाले आहेत, यामध्ये 29 जवानांनी शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये आपले प्राण गमावले आहेत.