Anti Drone System : सीमेपलीकडून होणाऱ्या ड्रग्ज आणि हत्यारांच्या तस्करीला बसणार आळा, भारत उचलणार मोठे पाऊल
Anti Drone System : ड्रग्ज तस्करी आणि ड्रोनचा धोका लक्षात घेता संरक्षण मंत्रालयाकडून ड्रोनविरोधी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. गोदरेज कंपनीने भारतातील या काउंटर ड्रोन सिस्टिमसाठी फ्रेंच कंपनीसोबत करार केला आहे.
Anti Drone System : गेल्या काही दिवसांमध्ये सीमेपलीकडून भारतात ड्रग्जची तस्करी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय ड्रोनचा देखील धोका वाढलाय. त्यामुळे आता या ड्रग्ज तस्करी आणि ड्रोनचा धोका लक्षात घेता संरक्षण मंत्रालयाकडून ड्रोनविरोधी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. ड्रग्ज तस्करी आणि सीमेवर होणारे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणा तयार करण्यात येत आहे.
दिल्लीतील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या BPRD च्या मुख्यालयात काउंटर ड्रोन प्रणालीचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. सुरक्षित कपाटांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज कंपनीच्या मदतीने ड्रोनविरोधी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. गोदरेज कंपनीने विशेष अँटी-यूएव्ही ड्रोन प्रणाली तयार केली आहे.
गोदरेज कंपनीने भारतातील या काउंटर ड्रोन सिस्टिमसाठी फ्रेंच कंपनीसोबत करार केला आहे. ही अँटी-ड्रोन प्रणाली एका खास बंदुकीसारखी दिसते. या प्रणालीला चिमेरा ( Chimera ) असे नाव देण्यात आले आहे. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक सुमन महापात्रा यांनी एबीपी न्यूजला याबाबत माहिती दिली आहे.
गोदरेज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चिमेरा सिस्टीममध्ये कोणत्याही ड्रोनला ट्रक करण्याची क्षमता आहे. ही सिस्टीम ड्रोनची रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) जाम करते. याच्या मदतीने शत्रूचे ड्रोन एकतर जमिनीवर पडेल किंवा ते पुन्हा आपल्या हद्दीत परत जाईल. चिमेराच्या स्टॅटिक व्हर्जनची रेंज 4 ते 5 किमी आहे. ही सिस्टीम कोणत्याही संवेदनशील इमारतीत किंवा रॅलीच्या ठिकाणी स्थापित केले जाऊ शकते.
गोदरेजचे सुमन महापात्रा यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमेरा मॅन पॅड अँटी ड्रोनची किंमत 3-4 कोटी रुपये आहे. देशातील काही सुरक्षा यंत्रणांनी व्हीव्हीआयपी सुरक्षेत याचा वापर सुरू केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने सुरक्षा एजन्सींची नावे उघड करण्यास नकार दिला. सीमेवर पाकिस्तानकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी ड्रोनद्वारे होत आहे. बीएसएफला हे ड्रोन नष्ट करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत चिमेरासारखी ड्रोनविरोधी यंत्रणा खूप प्रभावी ठरू शकते. याशिवाय ड्रोन हल्ल्याचा धोकाही कायम आहे. गेल्या वर्षी जम्मू एअरबेसवर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे ही यंत्रणा खूप महत्वाची आहे.
परदेशात ड्रोनमधून व्हीव्हीआयपी व्यक्तींवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने (बीपीआरडी) दिल्लीतील चौथ्या पोलिस अधीक्षक परिषदेची थीम सायबर-क्राइम आणि काउंटर ड्रोन ही ठेवली आहे. या दरम्यान काउंटर ड्रोन प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय (29-30 सप्टेंबर) परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते करण्यात आले.