Bihar Jail Rule Changed : माजी खासदाराच्या सुटकेच्या निर्णयावर IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा रोष, पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती
Bihar Jail Rule Changed : IAS जी. कृष्णैय्या यांच्या हत्येतील दोषी माजी खासदार आनंद मोहन सिंहच्या सुटकेचा निर्णय बिहार सरकारने घेतला. जी. कृष्णैय्या यांच्या पत्नीने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Bihar Jail Rule Changed : गोपालगंजचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी, IAS, जी. कृष्णैय्या (IAS G. Krishnaiah) यांच्या हत्येतील दोषी माजी खासदार आनंद मोहन सिंहच्या सुटकेचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. बिहार सरकारने हा निर्णय त्यांच्या स्वार्थासाठी घेतला असल्याची संतप्त टीका दिवंगत IAS जी. कृष्णैय्या यांच्या पत्नी उमा कृष्णैय्या यांनी केली आहे. बिहार सरकारच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचे असे निर्णय गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतील, असेही त्यांनी म्हटले.
बिहारमधील अनुसूचित जातीमधील आयएएस (IAS) अधिकारी जी. कृष्णैय्या यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला 'बाहुबली' राजकारणी झालेला आनंद मोहन सिंह याला फाशीची शिक्षाच योग्य होती. त्याला फाशी दिल्यास गुन्हेगारांना धाक राहील, असे मत दिवंगत आयएएस (IAS) अधिकाऱ्याच्या पत्नीने व्यक्त केले.
बिहार सरकारने 15 वर्षांच्या तुरुंगवासानंतर माजी खासदार आनंद मोहन सिंह याची सुटका करण्यासाठी कैद्यांच्या सुटकेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. दिवंगत IAS जी. कृष्णैय्या यांच्या पत्नी उमा कृष्णैय्या यांनी या प्ररकणावर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारच्या निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश जाईलअशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सरकारचे असे निर्णय एकप्रकारे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहेत. तुम्ही गुन्हा करा आणि तुरुंगात जा आणि नंतर सुटका होऊन राजकारणात परत या, असा संदेश पसरतोय. दोषीला फाशीची शिक्षा योग्य होती, असे उमा कृष्णैय्या यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निर्णय परत घेण्यास सांगावे, अशी विनंती दिवंगत उमा कृष्णैय्या यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
बिहार सरकारचे असे राजकीय निर्णय कोणालाही पटणार नाही, असे उमा कृष्णैय्या यांनी म्हंटले आहे. सरकाच्या या कृतींवर आयएएस असोसिएशनचा सल्ला घेणार असल्याचे उमा कृष्णैय्या म्हणाल्या. यावर चर्चा करुन एका आठवड्यात निर्णय घेईल, असेही पुढे त्या म्हणाल्या.
माजी खासदार आनंद मोहन सिंहला 2007 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, पण नंतर पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली. तो 15 वर्षांपासून तुरुंगात आहे. बिहार सरकारच्या सुटकेच्या निर्णयानंतर राजकारणात चर्चेची ठिणगी पडली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर आनंद मोहन सिंह पुन्हा राजकारणात उडी घेईल, असे म्हटले जात आहे.
बिहार सरकारवर होत असेलल्या आरोपांना उत्तर देताना जेडीयूने सिंह याने तुरुंगवासाची मुदत पूर्ण केल्याचे म्हटले आहे. तसेच, नितीश कुमार सरकार "आम" आणि "खास" लोकांमध्ये फरक करत नाही यावर जोर देत सत्ताधारी जेडीयूने होत असेलल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
संबंधित बातम्या: