शशी थरुर अमेरिकेला भेट देणार, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे 'या' देशांमध्ये भारताची बाजू मांडणार, पाकिस्तानचे खोटे दावे खोडून काढणार
All Party Delegation Leaders : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील पाकिस्तानचा सहभाग जगासमोर मांडण्यासाठी आणि भारताची दहशतवादविरोधी भूमिका ठामपणे मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना जगभर पाठवण्यात येणार आहे.

All Party Delegation नवी दिल्ली: भारताची दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्सची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय सात खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांचा दौरा करणार आहे. शशी थरुर, रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा, संजयकुमार झा, सुप्रिया सुळे, के. कनिमोझी आणि श्रीकांत शिंदे हे सात खासदार शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. सूत्रांच्या माहितीनुसार शशी थरुर अमेरिका, रविशंकर प्रसाद मध्यपूर्व, कनिमोझी रशिया आणि स्पेन, सुप्रिया सुळे दक्षिण आफ्रिका, इस्त्रायल आणि केनिया, संजय झा जपान आणि मलेशिया, बैजयंत पांडा पश्चिम यूरोप आणि श्रीकांत शिंदे यूएई आणि आफ्रिकन देशांना भेटी देतील. हा दौरा 23 मे पासून सुरु होऊन 10 दिवस सुरु राहील. प्रत्येक शिष्टमंडळ 5 देशांचा दौरा करणार आहे.
कोण-कोणत्या खासदारांचा समावेश ?
अनुराग ठाकुर, अपराजिता सारंगी, मनीष तिवारी, असदुद्दीन ओवेसी, अमर सिंह, राजीव प्रताप रूडी, समिक भट्टाचार्य, बृज लाल, सरफराज अहमद, प्रियंका चतुर्वेदी, विक्रमजीत साहनी, सस्मित पात्रा आणि भुवनेश्वर कलिता यांच्यासह इतर पक्षांच्या खासदारांचा शिष्टमंडळात समावेश असेल. खासदार नसूनही माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा समावेश आहे. तर, टीएमसीचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी आरोग्याच्या कारणामुळं माघार घेतली आहे.
ससंदीय कार्यमंत्र्यांकडून नियोजन
या शिष्टमंडळांच्या भेटींचं आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचं नियोजन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकार या शिष्टमंडळाद्वारे पाकिस्तानकडून दहशतवादाला होत असलेल्या मदतीचा मुद्दा जगासमोर मांडणार आहे. सरकारनं हे पाऊल ऑपरेशन सिंदूर नंतर उचललं आहे. पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूर नंतर फेक नरेटिव्ह सुरु केलं आहे, या विरोधात भारत जगभरात आपली बाजू मांडणार आहे. भारतानं पाकिस्तानातील आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यापैकी चार पाकिस्तानातील ठिकाणांवर तर 5 पाक व्याप्त काश्मीरमध्ये हल्ले करण्यात आले होते.
काँग्रेसकडून चार नावांची शिफारस पण...
काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी म्हटलं सरकारनं चार नावं मागितली होती. आम्ही चार नावं दिली होती. मात्र, सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानंतर आश्चर्याचा धक्का बसला. सरकारचं वर्तन प्रामाणिकपणाचं दिसून येत नाही. सरकार गंभीर विषयांमध्ये खेळ खेळत आहे. सराकरची कुटनीती अयशस्वी ठरली आहे. सरकारला ट्रम्प यांना थेट उत्तर द्यायचं नाही. सरकारनं संसदेचं विशेष सत्र बोलवावं असं जयराम रमेश म्हणाले. जयराम रमेश म्हणाले की कोणत्याही व्यक्तीवर टिप्पणी करायची नाही मात्र काँग्रेसमध्ये असणं आणि काँग्रेसचं असणं यात जमीन आकाशाचा फरक आहे.आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार या चार जणांची नावं काँग्रेसनं सुचवली होती.


















