मोठी बातमी : एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द, 300 कर्मचारी अचानक सुट्टीवर, नेमकं कारण काय?
Air India Express Flights Delayed : एअर इंडिया एक्सप्रेसच्या काही वरिष्ठ क्रूकडून तब्येत खराब झाल्याचं कारण देण्यात आलं. जवळपास 300 कर्मचारी अचानक सुट्टीवर गेले. यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.
मुंबई : एअर इंडिया एक्सप्रेसवर (Air India Express) मोठं संकट कोसळलं आहे. एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक कर्मचारी सुट्टीवर गेल्याने अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या काही वरिष्ठ क्रूकडून तब्येत खराब झाल्याचं कारण देण्यात आलं. अनेक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेले. त्यानंतर अनेक फ्लाईट्स रद्द (Flights Cancelled) करण्यात आल्या आहेत किंवा उशिराने फ्लाईट्स (Flights Delayed) शेड्युल्ड आहेत. आतापर्यंत जवळपास 86 उड्डाणे एअर इंडिया एक्सप्रेसची रद्द करण्यात आली आहेत, यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द
एअर इंडिया एक्सप्रेसकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी आमचे काही कर्मचारी आजारी पडलेत आणि त्यामुळे काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. कर्मचाऱ्यांशी संवाद साधत यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान, यामुळे प्रवाशांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेत कंपनी 100 टक्के पैसे परत देण्याची किंवा पर्यायी फ्लाईट्सची व्यवस्था करत असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे.
सुमारे 300 कर्मचारी अचानक सुट्टीवर
फ्लाईट्स रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतात झाला आहे. कोची, बंगळुरु आणि कोलकातामधून फ्लाईट्स रद्द झाल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे . सुमारे 300 कर्मचारी सामूहिक सुट्टीवर गेल्याने अनेक फ्लाईट्स उशिराने किंवा रद्द झाल्यात आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या दररोज जवळपास 380 फ्लाईट्स उड्डाणे घेत असतात, यातील आतापर्यंत 89 फ्लाईट रद्द झाल्यात आणि काही फ्लाईट्स उशिराने शेड्युल्ड आहेत.
उड्डाणे रद्द करण्याबाबत अहवाल मागवला
MoCA नं एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत अहवाल मागवला आहे. सोबतच समस्यांचं त्वरित निराकरण करण्यास सांगितलं आहे. तसेच, डीजीसीएच्या निकषांनुसार प्रवाशांना सुविधा देण्याची त्यांना सूचना देण्यात आली आहे.
कर्मचारी सामूहिक सुट्टीवर जाण्यामागचं नेमकं कारण काय?
एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट (आधीची एअर एशिया इंडिया) यांच्या विलिनीकरणात कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या धोक्यात असल्याचं वाटतं आहे. यासोबतच बढतीत देखील अडचणींचा सामना होतोय. सुत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये कर्मचाऱ्यांना बढती देण्यासाठी सेवा ज्येष्ठतेऐवजी गुणवत्तेवर आधारीत बढती ग्राह्य धरण्याकडे वाटचाल होत आहे.
बढतीवरुन कर्माचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण
यामुळे वरीष्ठ कॅबिन क्रूमध्ये नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. ही नाराजी त्यांनी झालेल्या टाऊन हॉलमध्ये बोलून देखील दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणी नाराजी दूर करण्याचा कंपनीकडून प्रयत्न होत होते आणि त्यासाठी मॅनेजमेंटनं टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, काही दिवसांआधी विस्तारा कंपनीतही अशाच अडचणी आल्या होत्या.
एव्हिएशन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता
एअर इंडिया आणि विस्तारा याचं विलिनीकरण होतंय तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट (एअर एशिया इंडिया) यांचं विलिनीकरण होतंय. त्यामुळे एव्हिएशन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरी संदर्भात चिंता वाटत असल्यानं असं प्रकार होत असल्याचं समोर येतं आहे.