Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
Ahmedabad plane crash : गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच कोसळलं आहे.

Ahmedabad plane crash अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना (plane crash) घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात (passenger aircraft) कोसळलं आहे. एअर इंडियाचं (Air India) ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून 10 क्रू मेंबरांसह तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे, घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.
पायलटकडून दुर्घटनेपूर्वी आपात्कालीनचा संदेश
विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश (मे डे कॉल) दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली.
रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळले विमान
एअर इंडियाचं हे विमान एका इमारतीवर कोसळलं असून ती इमारत रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचं ऑफिशियल स्टेटमेंट
"अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं एअर इंडियाचं फ्लाइट 171 आज अपघातग्रस्त झालं, या दुर्घटनेची मी अत्यंत दुःखद मनानं पुष्टी करतो. या विनाशकारी घटनेत बाधित झालेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसोबत आम्ही आहेत. सध्या, आमचे प्राथमिक लक्ष सर्व दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यावर आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना आवश्यक अशी सर्वोतोपरी मदत प्रदान करण्यासाठी आम्ही शक्यतो सर्व प्रयत्न करत आहोत. या दुर्घटनेची अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट्स आम्ही शेअर करू. एक आपात्कालीन केंद्र तात्काळ सुरू करण्यात आलं आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त प्रवाशांबाबत माहिती घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पथकं नेमण्यात आली आहेत."
एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 विमान
अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला. अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात विमानाचा अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे, येथेच हा अपघात झाला आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. अपघातात मोठी जवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान कोसळलं असून या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे. या विमानात 10 क्रू मेंबर्स आणि 242 प्रवासी प्रवास करत होते.
विमानात 169 भारतीय, तर 53 ब्रिटीश नागरिक
एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त प्रवासातून एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाहांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन
विमानत अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. तसेच, पोलीस आयुक्त, गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शाहांनी फोन केला. केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरुन दिले आहे.
शरद पवारांकडून शोक व्यक्त
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. विमान दुर्घटनेवर शरद पवारांनी शोक व्यक्त केला आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे ट्विट
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला, आणि दुःख झाले. आम्ही या घटनेनंतर मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. घटनास्थळावर बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत आणि घटनास्थळी वैद्यकीय मदत आणि इतर मदत पोहोचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. विमानातील सर्व प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी माझी प्रार्थना, असेही नायडू यांनी म्हटले.
Shocked and devastated to learn about the flight crash in Ahmedabad.
— Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) June 12, 2025
We are on highest alert. I am personally monitoring the situation and have directed all aviation and emergency response agencies to take swift and coordinated action.
Rescue teams have been mobilised, and all…
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
























