Agnipath Scheme Protest: अग्निपथ योजनेविरुद्ध काँग्रेसचा 'सत्याग्रह' सुरु, प्रियंका गांधींची उपस्थिती
आज काँग्रेसच्या वतीनं दिल्लीच्या जंतमरंतरवर 'सत्याग्रह' आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सहभागी झाल्या आहेत.
Congress Satyagrah: केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलनं होत आहेत. या आंदोलनात आता काँग्रेस देखील सहभागी झाली आहे. आज काँग्रेसच्या वतीनं दिल्लीच्या जंतमरंतरवर 'सत्याग्रह' आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सहभागी झाल्या आहेत. तसेच काँग्रेस अन्य दिग्गज नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
एकीकडे देश जळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधानांनी अग्निपथ योजनेची प्रशंसा करण्यासाठी त्यांच्या पीआर टीमला गुंतवलं असल्याचे वक्तव्य राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केलं. सरकारनं ही योजना मागे घ्यावी असे ते म्हणाले. या योजनेला अग्निचे नाव का देण्यात आले? पंतप्रधानांनी पुढे येऊन उत्तर द्यावं असेही प्रतापगढी म्हणाले. या सत्याग्रह आंदोलनात काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद, मनिष तिवारी, सचिन पायलट, शक्ति सिंह गोहिल हे नेते उपस्थित आहेत.
जनतेच्या मनातील संतापाचा विचार सरकारला करावा लागेल : सचिन पायलट
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही या योजनेवरुन केंद्र सरकारवर टीका केली. ही खूप कठीण वेळ आहे. सरकारने या योजनेचा कोणताही विचार केला नसल्याचे पायलट म्हणाले. हिंसाचार हे कशावरचेही उत्तर नसून त्यांनी शांततेचं आवाहन केलं. मात्र जनतेच्या मनातील संतापाचा विचार सरकारला करावा लागेल असे पायलट म्हणाले. लोक केवळ नोकरी, व्यवसाय आणि टॅगसाठी सैन्यात जात नाहीत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विट करुन या योजनेवर टीका केली होती. आठ वर्षांपासून भाजप सरकारनं 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अवमान केला आहे. पंतप्रधानांना कृषी कायदे मागे घ्यावे लागतील असे मी पूर्वी म्हटले होते. त्यानंतर ते कृषी कायदे मागे घेतले. आता अग्निपथ योजना देखील सरकारला परत मागे घ्यावी लागले असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेमुळं आपल्या देशातील तरुण संतप्त झाले आहेत. ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणं ही आपली जबाबदारी आहे. देशभरातील नेते अग्निपथ योजनेच्या विरोधात सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचत असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.