Agni 5 Missile Test: भारताचं महाशस्त्र अग्नि 5ची यशस्वी चाचणी; चीन, पाकसह अर्ध्या जगावर एकाच वेळी हल्ला करण्याची ताकत
भारतानं आज आणखी एक महत्वाची कामगिरी केली आहे. सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र अग्नि-5 (Agni-5 ICBM) ची यशस्वी चाचणी आज घेण्यात आली.
Agni 5 Missile Test: भारतानं आज आणखी एक महत्वाची कामगिरी केली आहे. सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र अग्नि-5 (Agni-5 ICBM) ची यशस्वी चाचणी आज घेण्यात आली. हे एक सुपर वेपन असलेलं क्षेपणास्त्र आहे, ज्याच्या रेंजमध्ये संपूर्ण चीन-पाकिस्तानसह अर्धे जग आहे. त्याचे नाव इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल अग्नी-5 (ICBM Agni-V). संपूर्ण रशिया, युक्रेन, मादागास्कर, इंडोनेशिया देखील या क्षेपणास्त्राच्या श्रेणीत येतात. भारताने आतापर्यंत आठ यशस्वी चाचण्या केल्या आहेत. पहिल्यांदाच हे क्षेपणास्त्र त्याच्या पूर्ण रेंजमध्ये डागण्यात आले. म्हणजेच 5500 किलोमीटर दूर जाऊन अग्नि 5नं लक्ष भेदलं. डीआरडीओ (DRDO) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) यांनी संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र तयार केले आहे.
अग्नि-5 क्षेपणास्त्र (अग्नी-V) ताशी 29,401 किलोमीटर वेगाने शत्रूवर हल्ला करते. हे रिंग लेझर जायरोस्कोप इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम, जीपीएस, नेव्हीआयसी सॅटेलाइट मार्गदर्शन प्रणालीने सज्ज असलेलं क्षेपणास्त्र आहे. विशेष म्हणजे अग्नि-5 क्षेपणास्त्र अचूकपणे लक्ष्यावर मारा करते.
ओडिशातील अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी केली. चाचणीमध्ये डमी वॉर हेड वापरण्यात आले. ही चाचणी नवीन टेक्नॉलॉजी आणि उपकरणांच्या सहाय्याने करण्यात आली. गरज पडल्यास अग्नी-5 क्षेपणास्त्राची रेंज वाढवण्याची क्षमता या चाचणीने सिद्ध केल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
अग्नी-5 क्षेपणास्त्राचे (अग्नी-V) वजन 50 हजार किलो आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. त्याच्या वर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रात तीन स्टेज रॉकेट बूस्टर आहेत. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच ते एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते, असं सांगण्यात आलं आहे.
अग्नी-5 क्षेपणास्त्र (अग्नी-V) लाँच करण्यासाठी मोबाईल लाँचर्सचा वापर केला जातो. ते ट्रकवर चढवून कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते. भारताने हे क्षेपणास्त्र डागले तर ते संपूर्ण आशिया, युरोपचा काही भाग, युक्रेन, रशिया, जपान, इंडोनेशियावर हल्ला करू शकते. या क्षेपणास्त्राची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे MIRV तंत्रज्ञान (मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल्स). या तंत्रात क्षेपणास्त्रावर बसवलेल्या वॉरहेड्सची संख्या वाढवता येते. म्हणजेच क्षेपणास्त्र अनेक टार्गेट एकाच वेळी लक्ष्य करू शकते.
ही बातमी देखील वाचा