(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar Bandh : अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद, डाव्यांच्या संघटनांचा पाठिंबा
Bihar Bandh on Agneepath Scheme : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहारमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली आहे.
Bihar Bandh on Agneepath Scheme : केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली असून या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला डाव्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीनं या बंदला समर्थन दिलं आहे.
बिहारमध्ये इंटरनेट सेवा बंद
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अफवा रोखण्यासाठी बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेविरोधात निदर्शनाचा आज चौथा दिवस आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये 22 जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजने विरोधात निदर्शनं सुरु आहेत.
आंदोलना दरम्यान एकाचा मृत्यू
विद्यार्थ्याच्या या आंदोलनात आता या राजकीय पक्ष आल्याने याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये शुक्रवारी आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. गाड्या जाळण्यात आल्या. तसेच उत्तर प्रदेशातील बलिया येथेही ट्रेनचे काही कोच जाळण्यात आले. तर, तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोलिसांना हल्लेखोरांवर गोळीबार करावा लागला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
आंदोलनामुळे रेल्वेचं 40 कोटींचं नुकसान
देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असल्याने सध्या भारतीय रेल्वेला सर्वाधिक फटका बसत आहे. आतापर्यंत 340 गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचं 40 कोटींहून अधिक नुकसान झालं आहे. दरम्यान, बिहारमधील 12 जिल्ह्यांमध्ये 19 जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या