नरेंद्र मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' म्हणणाऱ्या 'टाईम' मॅगझिनकडून मोदींचं समर्थन करणाऱ्या लेखाला प्रसिद्धी
नरेंद्र मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' म्हणणाऱ्या 'टाईम' मॅगझिनकडून मोदींचं समर्थन करणाऱ्या लेखाला प्रसिद्धी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार टीमचे सदस्य मनोज लाडवा यांचा लेख प्रसिद्ध केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रसिद्ध अमेरिकन मॅगझिन 'टाईम'ने आपल्या कव्हर पेजवर फोटो छापत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' म्हटलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर टाईमने आता भाजपची याबाबत बाजू मांडणारा लेख प्रसिद्ध केला आहे. 'टाईम'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार टीमचे सदस्य मनोज लाडवा यांचा लेख प्रसिद्ध केला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान टाईमने (आशिया एडिशन) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मत माडलं होतं. त्यानुसार भारतातील जास्तीत जास्त लोक त्यांना समाजाचं विभाजन करण्याचं काम करणारे नेते म्हणून ओळखतात, असं टाईमने म्हटलं होतं. मात्र भारतात मोदींच्या विरोधात कोणताही उत्तम पर्याय उपलब्ध नाही. म्हणूनच ते पुन्हा एकदा सत्ता स्थापन करतील, असा अंदाजही टाईमने व्यक्त केला होता.
टाईमने 1947 च्या इतिहासाचा दाखला दिला होता. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी धर्मनिरपेक्षता हेच सरकारचं मूळ असल्याचं मानलं होतं. मात्र काळानुरुप काँग्रेस पक्ष घराणेशाही राजकारणाचा प्रमुख चेहरा बनला. याबाबत अनेक पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिलं आणि 2014 हे वर्ष यासाठी महत्त्वपूर्ण ठरलं.
टाईमच्या रिपोर्टनुसार, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची धोरणं आणि तत्वांचा कडाडून विरोध केला, ज्यांचा आधार घेत काँग्रेस आपल्या यशाचा डंका पिटत होते. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. देशातील जवळपास सर्वच राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र 2014 च्या निवडणुकीनंतर केंद्रात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेला आकडाही काँग्रेसला गाठता आला नाही.
नरेंद्र मोदी नशिबवान आहेत की त्यांच्यासमोर सक्षम विरोधीपक्ष नाही. विरोधी पक्षांना कोणताही अजेंडा नाही, केवळ मोदींचा पराभव करणे हेच त्यांचं ध्येय आहे, असं टाईमच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. मोदी 2014 मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात काही अंशी अपयशी ठरले आहेत. मात्र त्यांनी अशा मुद्द्यांना आणि व्यक्तींना समोर आणलं की जे दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले, असं टाईमने म्हटलं.
मात्र लोकसभेच्या निकालानंतर टाईम मॅगझिनचे सूरही बदललेले दिसत आहेत. नरेंद्र मोदी आता टाईमसाठी डिव्हायडर इन चीफ म्हणजे देश तोडणारे नाही तर देश जोडणारे नेते बनले आहेत.