Arvind Kejriwal : ईडीनंतर आता दिल्लीचे नायब राज्यपाल सीएम केजरीवालांविरोधात सरसावले; एनआयए चौकशीची शिफारस
नायब राज्यपालांना तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आपने 2014 ते 2022 दरम्यान खलिस्तानी दहशतवादी गटांकडून 16 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 133 कोटी रुपये घेतल्याचे म्हटले होते.
नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात NIA तपासाची शिफारस केली आहे. बंदी घातलेल्या 'सिख फॉर जस्टिस' या दहशतवादी संघटनेकडून केजरीवाल यांनी राजकीय निधी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. नायब राज्यपालांना जागतिक हिंदू महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आशु मोंगिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) 2014 ते 2022 दरम्यान खलिस्तानी दहशतवादी गटांकडून 16 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 133 कोटी रुपये घेतल्याचे म्हटले होते. त्यामुळे देवेंद्र पाल भुल्लरची सुटका होईल. या तक्रारीच्या आधारे ही शिफारस केली आहे.
खलिस्तानी गटांकडून 16 दशलक्ष डॉलर्स मिळाल्याचा दावा
या पत्रात असे लिहिले आहे की, 1 मे रोजी वर्ल्ड हिंदू फेडरेशन इंडियाचे राष्ट्रीय महासचिव आशु मोंगिया यांनी नायब राज्यपालांकडे तक्रार पाठवली होती. त्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माजी AAP कार्यकर्ते डॉ. मुनीश कुमार रायजादा यांच्या काही पोस्टची प्रिंटआउट, एक पत्र आणि एक पेनड्राईव्ह देखील होता. आशु मोंगिया यांनी आपल्या तक्रारीत पेन ड्राईव्हमधील एका व्हिडिओचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांनी दावा केला होता की अरविंद केजरीवाल यांच्या पक्ष AAP ला 2014 ते 2022 दरम्यान खलिस्तानी गटांकडून 16 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. म्हणजेच 133.60 कोटी रुपये घेतले.
न्यूयॉर्कमध्ये भेट घेतल्याचा दावा
2014 मध्ये केजरीवाल यांनी न्यूयॉर्कमधील गुरुद्वारा रिचमंड हिल येथे खलिस्तान समर्थक शिखांची भेट घेतल्याचा दावाही करण्यात आला होता. या बैठकीत केजरीवाल यांनी 'आप'ला खलिस्तानी गटांकडून निधी मिळत राहिल्यास देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी मदत करू, असे आश्वासन दिले होते.तक्रारीत असेही म्हटले आहे की मुनीश कुमार रायजादा जे 2014 मध्ये आपचा कार्यकर्ता होते. त्यांनी अरविंद केजरीवाल आणि शीख नेत्यांच्या न्यूयॉर्कमधील रिचमंड हिल गुरुद्वारा येथे भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले होते. सार्वजनिक सभांव्यतिरिक्त केजरीवाल यांनी या गुरुद्वारामध्ये खलिस्तान समर्थक शीख नेत्यांशी एकांतात भेटही घेतली होती, असेही ट्विटमध्ये म्हटले होते.
केजरीवाल यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून भुल्लरच्या सुटकेची शिफारस केली होती. केजरीवाल यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून भुल्लरसाठी दयेची याचना केल्याचेही या पत्रात लिहिले आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी इक्बाल सिंग यांना लिहिलेल्या पत्राचाही समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या