Enforcement Directorate chief Rahul Navin : ईडीला अखेर पूर्णवेळ नवीन बाॅस मिळाला; सर्वाेच्च न्यायालयाच्या दणक्याने संजय मिश्रा पदावरून बाजूला
Rahul Navin : आंतरराष्ट्रीय कर तज्ज्ञ राहुल नवीन यांच्या कार्यकाळात दिल्ली सीएम अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे सीएम हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी, 14 ऑगस्ट रोजी 1993 बॅचचे IRS अधिकारी राहुल नवीन (Enforcement Directorate chief Rahul Navin) यांची अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate) अर्थात ईडी (ED) पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली. ते संजय कुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांची जागा घेतील. बिहारचे रहिवासी असलेला राहुल नवीन सध्या ईडीच्या कार्यकारी संचालक पदावर होते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) जारी केलेल्या आदेशात राहुल यांचा कार्यकाळ 2 वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत असेल, असे म्हटले आहे. ते 2019 मध्ये विशेष संचालक म्हणून ईडीमध्ये रुजू झाले. 15 सप्टेंबर 2023 रोजी संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कर तज्ज्ञ राहुल नवीन यांच्या कार्यकाळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.
B.Tech आणि M.Tech कानपूरमधून, 30 वर्षे इन्कम टॅक्समध्ये नोकरी
राहुल नवीन यांनी (Enforcement Directorate chief Rahul Navin) IIT कानपूरमधून B.Tech आणि M.Tech केले आहे. त्यांनी मेलबर्न येथील स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमबीए केले आहे. त्यांनी 30 वर्षे आयकर विभागातही काम केले आहे. ते आंतरराष्ट्रीय करविषयक बाबींमध्ये तज्ज्ञ आहेत. 2004-08 मध्ये राहुल यांच्या आयकर शाखेत कार्यकाळात, आयकर विभागाने व्होडाफोन प्रकरणासह अनेक परदेशी व्यवहारांवर कारवाईची मागणी केली होती. आयकर विभागात काम करत असताना, राहुल नवीन यांनी आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमतीशी संबंधित अनेक जर्नल्स लिहिली आहेत. हे लेख महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT) येथे प्रशिक्षणार्थी IRS अधिकाऱ्यांना शिकवले जातात.
त्यांनी 'माहिती विनिमय आणि कर पारदर्शकता : टॅकलिंग ग्लोबल टॅक्स इव्हॅशन अँड अवॉयडन्स' नावाचे मार्गदर्शक पुस्तक देखील लिहिले आहे, जे 2017 मध्ये प्रकाशित झाले. कोलकात्याच्या संदेशखली येथे ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर नवीन पश्चिम बंगालमध्ये पोहोचला होते. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कोणतीही भीती न बाळगता काम करण्यास सांगितले होते आणि भक्कम केस तयार केली होती. मनी लाँडरिंगविरोधी अंतर्गत तपास होत असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये वेळेवर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश राहुल यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संजय कुमार मिश्रा यांच्या कार्यकाळावर एक नजर
ईडीचे संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ 15 सप्टेंबर 2023 रोजी संपला होता. ते सुमारे 4 वर्षे 10 महिने ईडीचे संचालक होते. संजय गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. केंद्राने एका अध्यादेशाद्वारे त्यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवला होता, तर संजय मिश्रा यांचा कार्यकाळ दुसऱ्यांदा वाढवू नये, असे न्यायालयाने आधीच सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मिश्रा 31 जुलैपर्यंत पदावर होते. याच काळात सरकारला नवीन प्रमुखाची नियुक्ती करावी लागली.