BJP in North East : काँग्रेसयुक्त भाजप! ईशान्येकडील राज्यांत गेल्या 8 वर्षांत 93 आमदार फोडले, दोनवेळा निवडणुकीला सामोरे न जाता सरकार स्थापन
काँग्रेसमुक्त नारा देणाऱ्या भाजपने त्यांचेच नेते आयात केले आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये मोदी सत्तेत आल्यापासून भाजपने आयात केलेल्या 93 आमदारांपैकी 32 ( म्हणजेच एकतृतीयांश) काँग्रेसमधील आहेत.
BJP in North East : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काँग्रेसमुक्तचा नारा दिला असला, तरी प्रत्यक्षात त्याच काँग्रेसमधील आमदार आयात करून सत्ता स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. भाजपने ईशान्येकडील राज्यांकडे मोर्चा वळवताना एकामागोमाग एक असे करत इतर पक्षांचे 93 आमदार फोडून आयात केले आहेत. या यादीमध्ये आता मणिपूरमध्ये शुक्रवारी पाच JD(U) आमदारांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला त्याची भर पडली आहे.
अरुणाचल प्रदेशात भाजपने सर्वाधिक अमाप शक्तीचा वापर करत 2003 आणि 2016 मध्ये दोनदा भाजपने निवडणुकीला सामोरे न जाता सरकार स्थापन केले. या राज्यांमध्ये काँग्रेसचा बोलबाला असताना भाजपने इशान्येकडील प्रदेश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्यांचेच आमदार आयात करत सत्ता स्थापन केली.
इशान्येकडील राज्यात भाजपने 93 आमदार इतर पक्षातून आयात केले
काँग्रेसमुक्त नारा देणाऱ्या भाजपने त्यांच्याच पक्षातील नेते पावन करून आपल्याकडे आयात करण्याचा सपाटा लावला आहे. मोदी सत्तेत आल्यापासून म्हणजेच 2014 पासून भाजपने आयात केलेल्या 93 आमदारांपैकी 32 ( म्हणजेच एकतृतीयांश) काँग्रेसमधील आहेत.
जेडीयूचे आमदारही भाजपने फोडले
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला तगडा हादरा देत सत्तेतून बाजूला केले होते. त्यांनी भाजप पक्ष गिळंकृत करत असल्याचा आरोप केला होता. याचा सर्वाधिक प्रत्यय नितीशकुमार यांना इशान्येकडील राज्यांमध्ये आला. जेडीयूचे 2019 मध्ये अरुणाचल प्रदेशातील सहा आणि मणिपूरमध्ये शुक्रवारी पाच आमदार भाजपने शांतीत क्रांती करत मिळवले आहेत. अलीकडील काळात भाजपने ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीच्या आमदारांसाठी सुद्धा आपले दरवाजे उघडले आहेत.
भाजपने सरकार पाडून सरकार स्थापन केले
इशान्येकडील प्रदेशात भाजपचे पहिले सरकार निवडणुकीद्वारे नाही तर 2003 मध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या 36 आमदारांच्या पक्षांतराने होते. गेगॉन्ग अपांग यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार मात्र केवळ 42 टिकले. अरुणाचल प्रदेशातील अल्पायुषी सरकार वगळता 2014 मध्ये नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्तरावर येईपर्यंत ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपकडे पर्याय नव्हता. मात्र, त्यानंतर सर्व मार्गांचा वापर करत आपले बस्तान बसवले आहे.
आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा गळाला लागले
2016 मध्ये, आसामने भाजपला उत्तम सुरुवात करून दिली आणि विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच हेमंता बिस्वा सर्मा यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. जो या भागातील भाजपसाठी सर्वात मोठा गेम-चेंजर ठरला. अवघ्या सात महिन्यांनंतर, सरमा यांनी अरुणाचलमध्ये भाजपचे दुसरे सरकार स्थापन करण्यासाठी पहिली चाल केली आणि सरकार स्थापन केले. काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर 48 तासात भाजपने सत्ता स्थापन केली.
भाजपने मणिपूरमध्ये आसाम मॉडेलचा वापर करत 2017 च्या निवडणुकीपूर्वी, काँग्रेसचे तत्कालीन बलाढ्य एन. बिरेन सिंह यांच्यावर लक्ष केंद्रित केले, जे त्यावेळचे मुख्यमंत्री इबोबी सिंग यांचे मुख्य प्रतिस्पर्धी होते. निवडणुकीनंतर मणिपूरही भाजपच्या गोटात गेले.