Assam Flood : आसाममध्ये 7 लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका, 24 जणांचा मृत्यू
आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळ परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या पुराचा फटका 22 जिल्ह्यातील 7 लाखाहून अधिक नागरिकांना बसला आहे.
Assam Flood : आसाममध्ये पुरानं थैमान घातलं आहे. पुराच्या पाण्यामुळ तेथील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या पुराचा फटका 22 जिल्ह्यातील 7 लाखाहून अधिक नागरिकांना बसला आहे. रविवारी या पुरामुळे दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पूर आणि भूस्खलनात एकूण 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली असून, तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात चार लोक पाण्यात बुडाले आहेत. पुरामुळे होजई जिल्ह्यातील दुबोका येथे एका व्यक्तीचा आणि कचार जिल्ह्यातील सिलचरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 24 झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 7 लाख 19 हजार 540 लोक बाधित झाले आहेत. नागाव जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून तेथील 3.46 लाख लोक संकटात आहेत. यानंतर कचरमध्ये 2.29 लाख आणि होजईमध्ये 58 हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत.
भारतीय हवाई दलाची मदत सुरु
आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे मदतकार्य सुरुच आहे. भारतीय हवाई दलाने दोन Mi-17 हेलिकॉप्टर, एक चिनूक हेलिकॉप्टर आणि एक ALH ध्रुव हेलिकॉप्टर आपल्या AN-32 विमानांसह मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत. पुराच्या काळात 15 मे पासून आतापर्यंत हवाई दलाने 454 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या लोकांमध्ये 119 प्रवाशांचाही समावेश आहे. जे दामी हासाओ जिल्ह्यातील डितोकचारा रेल्वे स्टेशनवर अडकले होते. त्यांच्यासाठी हवाई दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरने रेल्वे ट्रॅकवर लँडिंग केले होते.
269 मदत छावण्यांमध्ये 91518 लोक
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील 269 छावण्यांमध्ये 91 हजार 518 बाधित लोक राहत आहेत. प्रशासनाने 152 मदत वितरण केंद्रेही स्थापन केली आहेत. आत्तापर्यंत भारतीय लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण 26 हजार 236 अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: