1st December In History :जागतिक एड्स दिवस, सीमा सुरक्षा दलाची स्थापना; आजचा दिवस इतिहासात महत्वाचा
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
On This Day In History : एक डिसेंबर हा दिवस अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. यामधील एक घटना तशी किरकोळ आहे, पण त्या घटनेनं इतके मोठे रुप धारण केले की इतिहासात नोंद झाली. 1955 मध्ये रोजा पार्क्स नावाच्या एका सावळ्या वर्णाच्या महिला अलाबामा एका बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी तिने गोऱ्या वर्णाच्या सहप्रवाशासाठी सीट सोडण्यास नकार दिला. या प्रकारामुळे तत्कालीन सरकारी नियम आणि नियमांच्या विरोधात वर्तन केल्याप्रकरणी त्या महिलेला दंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणाचा अमेरिकेत मोठा विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर मार्टिन लूथर किंग जूनियर यांच्या नेतृत्वात सावळ्या वर्णाच्या लोकांनी 381 दिवस बहिष्कार करत विरोध दर्शवला होता. या घटनेसह अनेक महत्वपूर्ण घटनामुळ एक डिसेंबर हा दिवस इतिहासात नोंदवला गेलाय. आजचा दिवस जगभरात जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जागतिक एड्स दिवस ( World AIDS Day 2022)
जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 पासून 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.
मेरी तूसाँ यांचा जन्म (Madame Tussauds ) -
मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा आजच्याच दिवशी 1761 मध्ये जन्म झाला होता. जेव्हा लंडनमधील संग्रहालये येतात, तेव्हा मादम तुसाद म्युझियमचे (the Madame Tussauds Museum) नाव सर्वात आधी येते. हे संग्रहालय केवळ लंडनमध्येच नव्हे; तर संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे. लंडनमधील हे एकमेव मेणाचे संग्रहालय आहे. जिथे जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे मेण पुतळे आहेत. भारतामधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे येथे आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, प्रियांका चोप्रा, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे येथे आहेत.
नागालँडची निर्मिती -
1963 मध्ये आजच्याच दिवशी नागालँड भारताचे 16 वे राज्य झाले. नागालँडची राजधानी कोहिमा आहे. या राज्याला पूर्वी नागा हिल्स त्वेनसांग या नावाने ओळखले जात होते. नागालँड एक प्राकृतिक सौंदर्याने नटलेले राज्य आहे. ज्याला चारही बाजूंनी पर्वतांनी घेरलेले आहे. नागालँड राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त अधिक जाती-धर्माचे नागरिक राहतात. ज्यांची संस्कृती, मान्यता, रीती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे.
सीमा सुरक्षा दलाची स्थापना (Border Security Force)
आजच्याच दिवशी 1965 मध्ये सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती. बीएसएफ हा भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली आहे. खुस्रो फारामर्ज रुस्तमजी सीमा सुरक्षा दलाचे संस्थापक आणि पहिले डायरेक्टर जनरल होते.
गायिका आशा भोसले यांना गदिमा पुरस्कार जाहीर -
कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला. एक डिसेंबर 1992 मध्ये आशा भोसले यांना गदिमा पुरस्कार जाहीर कऱण्यात आला.
पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म -
प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा आजच्याच दिवशी एक डिसेंबर 1955 रोजी जन्म झाला होता. 90 च्या दशकात उदित नारायण यांनी बॉलिवडूवर अधिराज्य केलेय. आजही 90 च्या दशकातील त्यांची गाणी मंत्रमुग्ध करतात.