19 February In History : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म, आज इतिहासात काय घडलं होतं?
Today In History : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. फेब्रुवारी महिन्यातील 19 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्यावर जन्म झाला.
Today In History : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. फेब्रुवारी महिन्यातील 19 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्यावर जन्म झाला. 18 पगड जातींना एकत्र करत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. पाहुयात आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय झालं?
1630 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातींना एकत्र करत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे.
गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या होत्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले.
1925 : दगडात जीव फुंकणारे कारागीर राम व्ही. सुतार यांचा जन्म
काही लोकांमध्ये अशी अद्वितीय प्रतिभा असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी आणि खास बनवते. आपल्या बोटांनी दगड-मातीमध्ये प्राण फुंकणारे देशाचे महान कारागीर राम वानजी सुतार हेही असेच व्यक्तिमत्त्व आहे. ते इतका सुंदर पुतळा तयार करत की शरीराच्या आकारापासून ते चेहऱ्यावरील हावभावांपर्यंत सर्व काही जिवंत असल्यासारखे वाटते. गुजरातमध्ये स्थापन झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विशाल पुतळ्याचे मूळ स्वरूपही या महान कारागिराने तयार केले आहे. 19 फेब्रुवारी 1925 रोजी जन्मलेल्या सुतार यांनी महात्मा गांधींच्या अनेक पुतळ्यांना आकार दिला आहे.
पद्मश्री आणि पद्मभूषण राम वानजी सुतार यांनी गांधींचे साडेतीनशेहून अधिक पुतळे साकारले आहेत. हे पुतळे केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक शहरांमध्ये आहेत. संसदेत इंदिरा गांधी, मौलाना आझाद आणि जवाहरलाल नेहरू यांचे पुतळेही सुतार यांनी बनवले आहेत. देशातील जवळपास सर्वच दिग्गज नेत्यांचे पुतळे सुतारांच्या हाताने घडवलेले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
1986 : भारतात प्रथमच संगणकाद्वारे रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्याची प्रणाली सुरू करण्यात आली
आजच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 1986 रोजी भारतात प्रथमच संगणकाद्वारे रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्याची प्रणाली सुरू करण्यात आली.
1997 : चीनमध्ये आर्थिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या डेंग झियाओपिंग यांचे निधन
चीनमध्ये आर्थिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या डेंग झियाओपिंग यांचे 19 फेब्रुवारी 1997 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने चीनमधील एका युगाचा अंत झाला. डेंग झियाओपिंग हे चीनच्या सुधारणा आणि सुधारणांचा पाया रचणारे प्रमुख शिल्पकार म्हणून जगप्रसिद्ध आहेत. डेंग यांनी 1980 च्या दशकात चीन-भारत संबंध सामान्य करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
2003 : अमेरिकेवरील हल्यातील दोषीला शिक्षा सुनावण्यात आली
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका व्यक्तीला दोषी ठरवून 19 फेब्रुवारी 2003 रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती. या हल्यात तीन हजारहून अधिक लोक मारले गेले होते.
2005 : टेनिपटू सानिया मिर्झाचा 'ऑस्ट्रेलियन ओपन' टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश
भारतीची टेनिपटू सानिया मिर्झाने 19 फेब्रुवारी 2005 रोजी 'ऑस्ट्रेलियन ओपन' टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानियाच्या आधी एकही भारतीय महिला टेनिसपटू येथे पोहोली नव्हती. त्याळे हा मान सानियाच्या नावे आहे.
2008 : फिडेल कॅस्ट्रो यांचा क्युबाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
फिडेल कॅस्ट्रो यांनी औपचारिकपणे क्युबाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी त्यांचा भावाने अध्यक्षपद स्विकारले.
2020 : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला कर्णधार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसर्या सामन्यात मिचेल स्टार्कला चौकार मारून विराट कोहली याने ही कामगिरी केली.
2020 : भारताने अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 3,500 किमी असल्याचे सांगण्यात येते.
2021 : भारतासोबतच्या चकमकीनंतर चार सैनिकांचा मृत्यू झाल्याची चीनची कबुली
चीनच्या 'पीपल्स लिबरेशन आर्मी' (पीएलए) ने जून 2020 मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर आठ महिन्यांनी प्रथमच आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूची अधिकृतपणे कबुली दिली.