14th July Headline : भारताच्या चांद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण होणार, तर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी,आज दिवसभरात
14th July Headline : चांद्रयान -3 चे प्रक्षेपण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.
14th July Headline : संपूर्ण भारतासह जगाचं ज्या मोहीमेकडे लक्ष आहे त्या इस्रोच्या चांद्रयान -3 मोहीमेचं प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन दुपारी 2.35 मिनिटांनी या यानाचे अवकाशात उड्डाण होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचा आज दुसरा दिवस असणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. याबाबत न्यायालय आता कोणते निर्देश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चांद्रयान - 3 चे होणार प्रक्षेपण
चांद्रयान -3 हे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन 14 जुलै रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने उड्डाण करणार आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं प्रमुख उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचा दुसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून मोदी आज बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होणार आहेत. परेडमध्ये तिरंगी सेवेची तुकडी आणि हवाई दलाची तीन विमानेही सहभागी होणार आहेत. तर पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही आज द्विपक्षीय बैठक होणार आहे. परेडनंतर पंतप्रधान फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला देखील ते उपस्थित राहतील.
ठाकरेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्यास सांगा अशी विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.दरम्यान ते कोल्हापुरात पक्ष बांधणीसाठी मेळावा घेणार आहेत. संध्याकाळी पेटाळा येथील मैदानात त्यांची सभा होणार आहे.
छगन भुजबळ येवला मतदारसंघात
छगन भुजबळ यांचे येवला मतदारसंघात स्वागत करण्यात येणार आहे. शरद पवार यांची सभा आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच मतदारसंघात जाणार असल्याने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्याचा दुसरा दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. तर राज ठाकरे हे रत्नागिरीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक
नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच बैठक होणार आहे. तर भुजबळ आज गैरहजर राहण्याची शक्यता आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला भुजबळ उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राणा दाम्पत्याची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कोर्टात हजर राहणार आहेत.या दोघांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.