(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ, अग्निपथ योजनेला युवकांचा विरोध, पोलिसांची करडी नजर
अग्निपथ आंदोलनाची धग शहरात पोहचण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात आली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
नागपूरः केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. उत्तर भारतात या विरोधाने हिंसक वळण घेतले आहे. बिहारमधील युवक रस्त्यावर उतरले असून आंदोलनात हिंसेच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे.
संरक्षण दलांमध्ये साडेसतरा ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी सेवेची संधी देणाऱ्या अग्निपथ योजनेला देशभरात तीव्र विरोध होऊ लागला आहे. या योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये जोरदार निदर्शने होत आहेत. बिहारमध्ये सलग चवथ्या दिवशी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून रेल्वेगाड्या पेटविल्या जात आहेत. आता उत्तर भारतात आंदोलनाचे हे लोन पसरले आहे.
याची गांभीर्याने दखल घेऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाचा समोरील परिसर तसेच मागच्या बाजूने आणि आतील सर्व आठ ही फलाटावर सुरक्षेच्या कारणातून बंदोबस्त वाढविला आहे. सकाळी 9 वाजतापासून जवळपास 50 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रेल्वे स्थानकावर बंदोवस्तात तैनात केले आहे. सर्व प्रकारच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर होती. अग्निपथ आंदोलनाची धग महाराष्ट्रासह शहरात पोहचण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रवाशांसह स्थानकांवर येणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. वरिष्ठांच्या आदेशावरून उत्तर भारतातील अलर्ट प्राप्त झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविली आहे. रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात आली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
आंदोलनामुळे या 8 गाड्या रद्द
समता एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेस, बंगळूरु हमसफर एक्स्प्रेस, बुराणी राप्ती सागर एक्स्प्रेस, सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस, अर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागपूर मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला, अनेकांना वेळेवर तिकीट रद्द करावे लागले. रिफंड घेण्यासाठी सुद्धा तिकीट आरक्षण कक्षात प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडले. त्याचप्रमाणे हावडा मार्गावर सुरु असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्या 3 ते 5 तास उशिरा धावल्या.