Santosh Bangar : हात-पाय सलामत ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर सगळ्या ऑफिसचा चुराडा करणार, संतोष बांगर यांची पीक विमा अधिकाऱ्याला धमकी
Hingoli Flood News : शेतकरी आत्महत्या करत असताना थातूरमातूर कारण देऊन मदत नाकारू नका, नाहीतर संतोष बांगरसारखा वाईट माणूस नाही असं आमदार बांगर म्हणाले.

हिंगोली : मराठवाड्यातील (Marathwada Flood) शेतकरी मरत असताना त्यांना मदत करा, कंपनीचं हित न पाहता शेतकऱ्यांचे हित पाहा. जर शेतकऱ्यांना मदत केली नाही तर तुमचे हात पाय सलामत ठेवणार नाही. हिंगोलीतील सगळ्या कार्यालयांचा चुराडा करणार अशी धमकी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिली. हातचे बाकी न ठेवता शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी त्यांनी केली.
आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यामध्ये झालेले संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. यामध्ये शिवसेना शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्याला चांगलाच दम दिल्याचं दिसून आलं.
Santosh Bangar Phone Call : हात पाय सलामत ठेवायचे तर
संतोष बांगर म्हणाले की, यंदाच्या पुरात शेतकऱ्यांची राख रांगोळी झाली, त्यांच्याकडे काहीही राहिलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे काहीही ठेऊ नका, शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करा. सोयाबीन, कापूस आणि तुरी गेल्या. शेतातील माती सगळी वाहून गेली. मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं जगणं वाट लागलं आहे. त्यामुळे वस्तुस्थितीला धरून सर्व्हे करा.
जर यात काही कमी जास्त झालं तर संतोष बांगरसारखा वाईट माणूस नाही. हिंगोलीत एकही माणूस ठेवणार नाही. तुमच्या ऑफिसचा चुराडा करेन. तुमचे हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा अशी धमकीच संतोष बांगर यांनी दिली.
मी या नंतर पुन्हा बोलणार नाही, जे काही आहे ते नियमानुसार करा असं बांग म्हणाले. त्यावर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे की आम्ही वार्षिक स्थिती दाखवू.
Santosh Bangar News : त्यांना त्याच भाषेत समजावलं पाहिजे
एबीपी माझाशी बोलताना संतोष बांगर म्हणाले की, "शेतकरी संकटात आहे, ते आत्महत्या करत आहेत. त्यावेळी पीक विमा कंपनी जर थातूरमातून कारण देत असेल तर त्यांना त्याच भाषेत समजावलं पाहिजे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला आहे, पण पीक विमा कंपन्या काही काम करत नाहीत. मी जी वस्तूस्थिती मांडली त्यामुळे पीक विमा कंपनीला खरी परिस्थिती समजली असेल. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नाही."
ही बातमी वाचा:






















