Pradnya Rajeev Satav: दारु माफियांच्या सांगण्यावरुन माझ्यावर हल्ला, आमदार प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषदेत आरोप
अवैध दारू आणि गुटख्याचे प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केल्याने माझ्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे.
हिंगोली: जिह्यातील अवैध दारू आणि अवैध गुटख्याचे प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आल्यानेच आपल्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ आहे असं सांगत प्रज्ञा सावत (Pradnya Satav) यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेमध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर बोलताना आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या की, "विना नंबरच्या दुचाकीवरून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अवैधरित्या दारू पोहोचवणारी यंत्रणा निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुण पीढीला सहजरित्या दारु उपलब्ध होत असून ही पीढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे."
जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी गुटखा आणि जुगाराचा धंदा सर्रासपणे सुरू आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत असा आरोप आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, हिंगोली जिल्ह्यांमध्ये दररोज लाखोंचा गुटखा आणला जातोय. या संदर्भात मी विधानपरिषदेमध्ये दोनवेळा प्रश्न उपस्थित केल्याने याचा त्रास मलासुद्धा सहन करावा लागला आहे. दारू माफियांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यातील 8 फेब्रुवारी रोजी आमदार प्रज्ञा सातव या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या होत्या की, महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.
यानंतर सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्याविरोधात हिंगोली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असून त्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं.
ही बातमी वाचा: