(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease: हिंगोलीत 366 गावात लम्पीचा फैलाव, 179 जनावरांनी गमावला जीव
Lumpy Skin Disease: हिंगोली जिल्ह्यातील 366 गावात लम्पीचा फैलाव झाल्याचे देखील आकडेवारीतून समोर येत आहे.
Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरात अनेक ठिकाणी लम्पी आजाराचा (Lumpy Skin Disease) फैलाव पाहायला मिळाला. हजारो जनावरे डोळ्यासमोर जीव सोडत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसले. दरम्यान महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यात लम्पीचा थैमान पाहायला मिळाला. अशातच आता हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एकट्या छोट्याश्या हिंगोली जिल्ह्यात लम्पीमुळे तब्बल 179 जनावरांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. तर जिल्ह्यातील 366 गावात लम्पीचा फैलाव झाल्याचे देखील आकडेवारीतून समोर येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनानंतर लम्पी आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनामुळे मनुष्यहानी तर लम्पीमुळे जनावरांना प्राण गमवावे लागत आहे. यात 35 गाई, 40 बैल तर 105 वासरांना आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव होण्यापूर्वीच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम हाती घेतली होती. तोपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश गावात लम्पीचा शिरकाव झाला होता. तर 27 सप्टेंबर 2022 मध्ये पहिला लम्पीने बाधित जनावराचा मृत्यू झाला होता.
- आतापर्यंत 366 गावांमध्ये लम्पी आजार पसरला आहे.
- आतापर्यंत 3196 बाधित जनावरे आढळून आली.
- पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उपचारानंतर 1984 जनावरे बरी झाली
- तरीही 179 जनावरांना आपला जीव गमवावा लागला.
- आत्तापर्यंत 35 गाई, 40 बैल तर 104 वासरांचा समावेश आहे.
- जिल्ह्यात लसीकरण पुरवठा 241800
- lलसीकरण (ईपी सेंटर) 222157
- क्लीन वॅक्सीन 16496
- खासगी लसीकरण 9800
- एकूण लसीकरण 238653
शेतकऱ्यांना मोठा फटका...
आधीच अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर लम्पीचं नवीन संकट उभे राहिले आहे. लाखमोलाची जनावरे डोळ्यासमोर जीव तोडत असल्याचे पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. सद्या लम्पीची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र असे असलं तरीही अजूनही काही ठिकाणी लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहे. तर लसीकरण केल्यावर देखील काही ठिकाणी जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
तालुका | मृत्यू | बरे झालेले जनावरे |
हिंगोली | 32 | 550 |
कळमनुरी | 22 | 153 |
औंढा | 39 | 499 |
वसमत | 55 | 586 |
सेनगाव | 31 | 196 |
एकूण | 179 | 1984 |