(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही स्थान मिळणार नाही; हार्दिक पांड्याला गौतम गंभीरकडून वॉर्निंग?
Hardik Pandya Team India: हार्दिक पांड्याला कर्णधारपद न मिळाल्याने त्याच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्न उपस्थित होणार आहेत.
Hardik Pandya Team India: भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यात 27 जुलैपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधार म्हणून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
हार्दिक पांड्याला कर्णधारपद न मिळाल्याने त्याच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्न उपस्थित होणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पांड्या चांगली कामगिरी करू शकला नाही तर काय होईल? गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल दिसणार आहे. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार असून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिकने सहभाग न घेतल्याने त्याच्या भवितव्याबाबतही चिंता निर्माण होत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीच्या फिटनेस चाचणीचं परीक्षण केलं जाणार आहे.
हार्दिक पांड्याला वॉर्निंग?
विजय हजारे ट्रॉफीदरम्यान हा्र्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर बीसीसीआय विशेष लक्ष देईल. त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जाईल. त्यानंतरच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी निर्णय घेतला जाईल. हार्दिक पांड्या थेट भारतीय संघात जागा मिळणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अष्टपैलू गोलंदाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे बीसीसीआय अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच वनडे संघात स्थान मिळवायचं असल्यास पूर्ण गोलंदाजी करावी लागेल, अशी वॉर्निंगही निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
शुभमन गिल उपकर्णधार-
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा मालिकेत 4-1 असा पराभव केला. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलचे उपकर्णधार होणे चर्चेचा विषय बनले आहे. शुभमन गिल अवघा 24 वर्षांचा असून संघात त्याच्यापेक्षा अनुभवी खेळाडू आहेत. सूर्यकुमारला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचे कर्णधारपद दिले असते, तरीही हार्दिकला उपकर्णधार बनवता आले असते, अशी चर्चा सुरु आहे.