Gondia News : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण; गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांना संपाचा फटका
Gondia News : एकीकडं अवकाळी पाऊस सुरु असताना दुसरीकडे मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्यात समोर आलं आहे.
Gondia News : सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान होत आहे. एकीकडं अवकाळी पाऊस सुरु असताना दुसरीकडे मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव येथील परिषद अंतर्गत येत असलेल्या आठ गावांना जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या संपाचा फटका बसत आहे. मागील चार दिवसापासून या गावात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळं नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
चार दिवसपासून नगर परिषदद्वारे लावण्यात आलेले नळाला पाणी नाही
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सगळे शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. याचा फटका आता सर्वसामान्य लोकांना बसत आहे. गोंदिया जिल्हा आमगाव येथील परिषद अंतर्गत येत असलेल्या आठ गावांना या संपाचा फटका बसत आहे. मागील चार दिवसापासून या गावात पाणी पुरवठा होत नाही. चार दिवसपासून नगर परिषदद्वारे लावण्यात आलेले नळाला पाणी येत नसल्यानं आठ गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरपर्यंत जावे लागत आहे. त्याचप्रमाणं विहिर किंवा बोरवेलनं पाण्याची सोय करावी लागत आहे.
40 हजार नागरिकांचा पाणीपुरवठा बंद
राज्यात 14 मार्चपासून सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपामध्ये नगर परिषदसुद्धा सहभागी झाली आहे. नागरपरिषदेद्वारे आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो.या आठ गावातील लोकसंख्या 40 हजार असून, या सर्व लोकांना मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. या आठ गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यानं नगरपरिषद संघर्ष समितीने प्रशासक तहसीलदार यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
संपामुळं विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल
गेल्या सहा दिवसापासून म्हणजे 14 मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सहा दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपवार आहेत. हा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आता हायकोर्टात गेला आहे. विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या संपामुळं रुग्णांचे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: