Dharamrao Baba Atram : दोन वर्षानंतर मंत्री करतो, अजितदादांनी शब्द दिला म्हणून थांबलोय; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
Dharamrao Baba Atram On Election : आधी स्वबळाची भाषा करणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धर्मराब बाबा अत्राम आता महायुतीची भाषा बोलत आहेत.

गडचिरोली : दोन वर्षानंतर मंत्री बनवतो असा शब्द अजितदादांनी (Ajit Pawar) दिला आहे, त्यासाठी आपण थांबलो असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराब बाबा अत्राम (Dharamrao Baba Atram) यांनी केलं आहे. येत्या काळात आपण मंत्री बनू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या आधी स्वबळाची भाषा करणारे अत्राम आता मात्र युतीची भाषा बोलू लागले आहेत. ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुती म्हणून लढू, इतर ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत लढू असं धर्मराब बाबा अत्राम म्हणाले.
येत्या वर्षभरात मंत्री बनणार असल्याचं धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अजितदादांच्या शब्दाचा संदर्भ दिला. दोन वर्षात मंत्री करतो असा शब्द अजितदादांनी दिला असल्याचं ते म्हणाले.
मंत्रिपद मिळाल्यानंतर गडचिरोलीचा विकास करू असं धर्मराव बाबा अत्राम म्हणाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कशी जिंकेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.
Dharamrao Baba Atram On Election : महायुतीचे उमेदवार देऊ
जिल्ह्यात ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार देऊ, बाकी ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती लढू असं वक्तव्य धर्मराव बाबा अत्राम यांनी केलं. त्या माध्यमातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील हे पाहू असंही धर्मराव बाबा अत्राम म्हणाले.
धर्मराव बाबा अत्राम म्हणाले की, "जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी अजित पवारांची भेट घेणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी मी सभा घेत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी तयारी करत आहे. या अनुषंगाने उद्या होणाऱ्या पक्षाचा बैठकीत निर्णय घेणार आहे. उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही याची रणनीती ठरवून पुढील निर्णय घेऊ."
Dharamrao Baba Atram On Election : या आधी भाजपला इशारा दिला होता
आता महायुतीची भाषा बोलणारे धर्मराब बाबा अत्राम यांनी या आधी स्वबळाची भाषा सुरू केली होती. चार दिवसांपूर्वी बोलताना ते म्हणाले होते की, माझ्या मतदारसंघात कोण किती जागा लढल्या पाहिजेत आणि कुणाला किती जागा दिल्या पाहिजेत हे मी ठरवणार. माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभं केलं. मला हरवायला भाजपने 5 कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या क्षेत्रात फक्त घड्याळच चालेल. एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही."
ही बातमी वाचा:
























