नागपूरः शहरातील सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील टेलिफोन एक्सचेंज चौक परिसरातील रोडच्या बाजूला फोनचे केबल टाकण्यासाठी नाली खोदण्यात आली होती. ही नाली फूड डिलेव्हरी बॉयच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायालयाने सोमवारी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह एकूण सहा आऱोपींना प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला व दंड न भरल्यास सर्वांना 15 दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे स्पष्ट केले आहे.
आरोपींमध्ये ठेकेदार कंपनी सिनसिस टेकचे कर्मचारी नितीन भगवान तुमसरे, अनिलकुमार अग्रवाल, टिप्पर चालक रोहित संजय समुंद्रे, विश्वजीत हुमने, अब्रार जुबेरी व नोमन अंसारी यांचा समावेश आहे. मृताचे नाव प्रशांत धर्माजी सोनटक्के (वय 47) आहे. ही घटना 22 एप्रिल 2019 रोजी सकाळी घडली होती. सोनटक्के टेलिफोन एक्सचेंज चौकातून जात असताना त्यांची दुचाकी नालीच्या मातीमुळे घसरली. परिणामी, सोनटक्के खाली कोसळून मागून येणाऱ्या टिप्परखाली आले. टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे सोनटक्के जागेवरच ठार झाले. न्यायालयाने आरोपींना निष्काळजीपणा व अन्य विविध गुन्ह्यांत दोषी ठरवून ही कमाल शिक्षा सुनावली.
वारसदारांना तीन लाख रुपयांवर भरपाई
आरोपी समुंद्रेने पाच हजार रुपये, तर इतर आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई मृताच्या वारसदारांना द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच दंडाची संपूर्ण रक्कमही वारसदारांनाच देण्यास सांगितले आहे. ही एकूण तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आहे.
इतर महत्वाच्या बातम्या