Nitin Deshmukh Retruns : अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले आहेत. मला हार्ट अटॅक आल्याचं वृत्त खोटं आहे. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. माझा घात करण्याचा प्रयत्न होता. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  


बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या 40 हून अधिक आमदारांचा मुक्काम सूरतमधील हॉटेलमध्ये होता. या आमदारांसोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु काही शिवसेना आमदारांना जबरदस्तीने, मारुन मुटकून सूरतला नेल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. शिवाय नितीन देशमुख यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नितीन देशमुख यांच्याबाबत नेमकं काय घडलं याची चर्चा सुरु झाली. अखेर नागपुरात परतल्यानंतर त्यांनी आपबिती सांगितली.


सूरतमध्ये नितीन देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने पहाटे चारच्या सुमारास त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना गंभीर अवस्थेत नवीन सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त होतं. हॉस्पिटलबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात इंजेक्शन टोचलं
याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, "माझी तब्येत टकाटक आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं.  तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं. आमचे मंत्री होते म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार."


शिंदे यांच्याकडूनच नितीन देशमुख यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था? 
आम्ही जबरदस्ती ठेवलं असतं तर आमचे लोक त्यांना सोडण्यासाठी गेले असते का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या आरोपावर केला आहे. शिवसेनेच्या नितीन देशमुख यांना एकनाथ शिंदे यांनीच विशेष विमानाची व्यवस्था करुन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुवाहाटी ते नागपूर या  विशेष विमानाने नितीन देशमुख आले.


पत्नीकडून मिसिंगची तक्रार
दरम्यान आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. रात्रीपासूनच ते संपर्कात नसल्याची तक्रार त्यांनी दिली होती. आपल्या पतीला लवकर शोधा, अशी विनंती आमदार देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी पोलिसांकडे केली आहे. पती नितीन देशमुख यांच्याशी शेवटचं बोलणं हे सोमवारी सायंकाळी सहा वाजता झालं होतं. त्यावेळी त्यांनी अकोल्याला येणार असल्याचं सांगितलं होतं. पुढे त्यानंतर सात वाजल्यापासून त्यांचा फोन लागत नसल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने दिली. त्यामुळे मी मिसिंगची तक्रार दाखल केली असल्याचे त्या म्हणाल्या. 


VIDEO : Nitin Deshmukh : Eknath Shinde गटातून सेना आमदार परतला, शिंदेंवर गंभीर आरोप