Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय  वातावरण ढवळून निघालंय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ही सर्व भाजपची खेळी असल्याचे सांगत भाजपला लक्ष्य केलं आहे. "ही सर्व खेळी भाजप छुप्या पद्धतीने खेळत आहे. जिकडे त्यांचं सरकार आहे तिकडेच विमान घेवून जातात. त्यांच्याच पोलीस संरक्षणात आमदारांना घेवून जातात. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलिसांच्या दबावामध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच भारतीय संविधानाची पायमल्ली करायची ही भाजपची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोप तपासे यांनी भाजपवर केलाय.


महेश तपासे आज डोंबिवली येथील पालिका मुख्यालयातील पत्रकार पक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपला लक्ष्य केलं. तपासे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, 2019 मध्ये माहाविकास आघाडी झाली त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला होता. त्यानुसार अडीच वर्ष सरकार चाललं, दोन वर्ष कोरोनाध्ये गेली. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजना आणि आमदारांना भरघोस निधी दिला. त्यामुळे कुणावर अन्याय झाला अशी परिस्थिती नाही. सध्या जो पेच प्रसंग  निर्माण झालाय, तो अंतर्गत विषय असला तरी तो मार्गी लागेल."


'शिवसेनेचे आमदार परत येतील'
"एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावान नेते आहेत, ते पून्हा येतील.  भाजपसोबत सत्ता स्थापन करायची असती तर ती 2019 मध्येच   झाली असती. भाजपने उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द फिरवला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. शिवसेना प्रमुख पदावर यावी अशी भाजपची आजही इच्छा नाही. ही सर्व खेळी भाजप छुप्या पद्धतीने खेळत आहे. जिकडे त्यांचं सरकार आहे तिकडेच आमदारांना नेले जात आहे. सध्याचा विषय शिवसेनेने हाताळावा, आम्ही शिवसेनेसोबत आहोत. काँगेसची देखील हीच भूमिका आहे. भाजपच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही. भाजपचा डाव उलटून पडेल आणि गेलेले सर्व आमदार पुन्हा स्वघरी येतील. सरकार अजिबात डळमळीत झालेलं नाही, असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला. 


महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे खासदारही नाराज? वर्षा निवासस्थानावरील बैठकीला 4 खासदारांची दांडी