(Source: ECI/ABP News/ABP Majha)
City Survey Office Nagpur : कर्मचाऱ्यांकडून काम होत नसल्यास थेट कार्यालय प्रमुखांना भेटा, नगर भूमापन अधिकाऱ्यांचे आवाहन
कार्यालयात अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोच कार्यालयातून प्राप्त करुन फेरफार प्रकरणाची स्थिती mahabhumi.gov.in या पोर्टलवर नि:शुल्क पाहू शकतात. सदर पोर्टलवरुन आखिवपत्रिका उपलब्ध करुन दिली आहे.
नागपूर: एप्रिल 2021 पासून 29 जून पर्यंत 18 हजार 995 नामांतरण अर्ज नगर भूमापन अधिकारी कार्यालय, नागपूर यांनी निकाली काढले, असल्याची माहिती नगर भूमापन अधिकारी यांनी दिली आहे. कार्यालयाशी संबंधित कामकाजाबाबत व फेरफाराबाबत संबंधित परीरक्षण भूमापक व कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
1 एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प ई.पी.सी.आय.एस अंतर्गत ऑनलाईन फेरफार प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीतून सर्वच प्रकारचे फेरफार प्रकरणावर त्वरित कार्यवाही केली जाते. नागरिकांनी कार्यालयात अर्ज सादर केल्यानंतर अर्जदार अर्जाची पोच कार्यालयातून प्राप्त करुन फेरफार प्रकरणाची स्थिती mahabhumi.gov.in या पोर्टलवर नि:शुल्क पाहू शकतात. तसेच सदर पोर्टलवरुन आखिवपत्रिका निशुल्क पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली आहे.
ऑनलाईन प्रणालीतील फेरफार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्राप्त ऑटो ट्रिगर फेरफार त्रुटी नसल्यास मुदतीत नि:शुल्क मंजूर केले जातात. सर्व प्रक्रीया ऑनलाईन असल्याने संबंधित अर्जदारांनी कार्यालयातून फेरफार प्रकरणांची पोच प्राप्त करुन घेतल्यानंतर कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या प्रकरणाची स्थिती अर्जदारांना पाहता येईल.
कार्यालय प्रमुखांशी करा संपर्क
नगर भूमापन अधिकारी क्रमांक 3 नागपूर या कार्यालयाकडून सामान्य नागरिकांना त्यांचे कामासाठी कार्यालय प्रमुख तसेच संबंधित परीरक्षण भूमापक यांचेशी भेट घेण्याकामी सांगण्यात येते. नागरीकांना कार्यालयाकडून त्रयस्थ पक्ष किंवा दलाल यांचेशी संपर्क साधण्यासाठी मज्जाव घालण्यात येते. दलालाकडून करुन काम करण्याविषयी हे कार्यालय प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
ऑनलाईन आखिवपत्रिकेसाठी
फेरफाराबाबत सविस्तर फलक कार्यालयाचे आवारात लावण्यात आले आहे. ई. पी. सी. आय. एस. कार्यप्रणालीतून ऑनलाईन आखिवपत्रिका काढण्याबाबत कार्यालयात सविस्तर फलक लावण्यात आले आहे. नागरीक digitalsatbara.gov.in या पोर्टलवरुन शुल्क भरुन ऑनलाईन आखिवपत्रिका काढू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली आहे.