Digpal Lanjekar : 'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकर मांडणार मराठवाड्याच्या संघर्षाची कथा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
Digpal Lanjekar : दिग्पाल लांजेकर यांचा 'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Digpal Lanjekar New Marathi Project : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर आता मराठवाड्याच्या संघर्षाची कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' असे या माहितीपटाचे नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या माहितीपटाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मराठवाड्याचा मुक्ती संग्राम नव्या पिढीसमोर यावा, अशी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा होती. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित 'मराठवाडा मुक्तीसंग्राम' या नाट्य माहितीपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. यावेळी या नाट्य माहितीपटाचे मान्यवरांनी कौतुक केले.
'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' या माहितीपटाची वैशिष्ट्ये काय आहेत?
- 'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्या'च्या संघर्षाची हा डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. म्हणजेच उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्यरूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून तयार केलेला माहितीपट.
- शिवराज अष्टकाचे जनक, 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' आणि 'सुभेदार' या सलग पाच वर्षात पाच सुपरहिट सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन करणारे दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.
- खालील उपलब्ध पुस्तके, संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिली आहे. सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.
- ब्रिटिशकालीन वृत्तवाहिन्यांवरील मूळ उपलब्ध व्हिडिओंचा अभ्यास करून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला आहे.
- अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे.
- केवळ 12 दिवसात हा 75 मिनिटांचा माहितीपट तयार करण्यात आला आहे.
- सावित्री ज्योती या माहितीपटासाठी पुरस्कार प्राप्त केदार दिवेकर यांनी या माहितीपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
- 'फत्तेशिकस्त' चित्रपटासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार प्राप्त निखिल लांजेकर यांनी या माहितीपटाचे ध्वनी आरेखन केले आहे.
- अनेक नावाजलेल्या हिंदी मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलेले प्रतीक रेडीज यांनी या माहितीपटातील नाट्यरूपांतरित भागाचे कला दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या