Tuljabhavani Temple: तुळजाभवानी देवीच्या शिल्पावरून पुन्हा पेटणार वाद? अष्टभुजा की द्विभुजा स्वरूपावरून मतभेद
Tuljabhavani Temple:देशभरातून दरवर्षी एक ते दीड कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात .त्यामुळे या देवस्थानाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 1865 कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला आहे.

Tuljapur: आई तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना च्या ऐतिहासिक क्षणाचा भव्य 108 फुटी उंच शिल्प साकारण्याच्या तयारीत असताना मंदिर संस्थानात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या शिल्पातील देवीचे रूप अष्टभुजा असावं की द्विभुजा यावरून पुन्हा एकदा मतभेद उफाळून आले आहेत . (Dharashiv News)
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या शिळांना पडलेले तडे, तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्या वरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता आई भवानीच्या 108 फुटी शिल्पात देवी अष्टभुजी असावी की द्विभुजी यावरून पुन्हा वाद सुरू झाले आहेत .महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी हे पूर्ण शक्तीपीठ आहे .देशभरातून दरवर्षी सुमारे एक ते दीड कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात .त्यामुळे या देवस्थानाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 1865 कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला आहे .
मंदिर संस्थानच्या निर्णयावरून वाद
या शिल्प निर्मितीच्या प्रक्रियेसाठी मंदिर संस्थानाने शिल्पकारण कडून अडीच ते तीन फूट उंच फायबर मॉडेल मागवले असून, त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेतील तपशिलात देवी अष्टभुजा असल्याचे स्पष्ट संकेत आहेत .कला संचालनालयाकडून दिलेल्या तिन्ही प्राथमिक संदर्भग्रंथांमध्ये देवीचे रूप अष्टभुजा असल्याचा उल्लेख आहे . या संदर्भ ग्रंथांमध्ये ‘श्री तुळजाभवानी’ (लेखक – रा. ची. ढेरे), ‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी’ (लेखक – दत्तात्रय माधवराव कुलकर्णी जोशी) आणि ‘महाराष्ट्राची चार दैवते’ (लेखक – गणेश हरी खरे) यांचा समावेश आहे. यातील तिन्ही ठिकाणी देवी अष्टभुजा स्वरूपात असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
अष्टभुजा मूर्तीवर प्रताप सरनाईक विरोध
दरम्यान, याच मुद्यावरून यापूर्वीही मोठा वाद निर्माण झाला होता. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी थेट मुंबईत बैठक घेऊन अष्टभुजा स्वरूपात दाखवण्यात आलेले देवीचे संकल्पचित्र मंदिर संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवरून हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र आता मंदिर संस्थानने शिल्पकारांना अष्टभुजा स्वरूपावर आधारित मॉडेल सादर करण्यास सांगितल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. देवीचं ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप अष्टभुजा असावं की द्विभुजा, या प्रकरणावर अजून कोणत्याही अधिकाऱ्याने स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी मंदिर संस्थानकडून अंतिम निर्णय घेतल्यानंतर वादावर पडदा पडतो की तो आणखी गडद होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.























