Delhi News : दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी शुक्रवारी सोशल मीडियाबाबत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. पोलिस गणवेशाची प्रतिष्ठा राखली जावी यासाठी रिल्स किंवा व्हिडिओ बनवताना पोलिस यंत्रणेचे कोणतेही उपकरण किंवा साहित्य वापरू नये, याबाबत निर्देश अरोरा यांनी दिले आहेत. सोशल मीडिया पोस्टमध्ये वस्तुस्थिती आणि भाषेबाबत पूर्ण दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांबाबत जनतेच्या मनात एक प्रतिमा असून ती प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विशेष म्हटले आहे.
सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक सूचना
दिल्ली पोलिस आयुक्तांनी पोलिसांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये पोलिसांसाठी अनेक प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय हित किंवा अंतर्गत सुरक्षेच्या विरोधात अशी कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका, असे या नव्या सूचनांमध्ये म्हटले आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशी छायाचित्रे आणि व्हिडीओ टाकू नका. सरकारी वाहने आणि कर्तव्यासाठी उपलब्ध शस्त्रे यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सोशल मीडियावर अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टपासून दूर राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. अल्पवयीन किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्या तक्रारदाराची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड करणे बेकायदेशीर असल्याचेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीची किंवा अतिसुरक्षित क्षेत्राची/ परिसराची छायाचित्रे किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि प्रसारित करणे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, सोशल मीडियावर पोलिस कर्मचार्यांनी पोस्ट केलेला मजकूर बेकायदेशीर, अश्लील, अपमानास्पद असा असणार नाही याची दक्षता बाळगावी.
पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कोणतीही पोस्ट करू नये. कोणत्याही धर्म, जात, पंथ किंवा पोटजातीच्या विरोधात प्रचार किंवा आंदोलन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोणत्याही गटात किंवा व्यासपीठावर त्यांचा सहभाग बेकायदेशीर आहे. अनेकदा ऑपरेशनल कव्हरेजसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन आणि कॅमेरे वापरण्यात आल्याची आणि सोशल मीडियावर संवेदनशील मजकूर अपलोड केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात असे नमूद केले आहे की असे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ केवळ अधिकृत वापरासाठी असावे.
इतर महत्वाच्या बातम्या