मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळीमधून (Vikhroli) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय जीवनात मुलांना घडवणाऱ्या शिक्षकानेच दुष्कृत्य केल्याचं उघड झालं आहे. महानगरपालिकेच्या शाळेत (Municipal Corporation School) चार मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. 


दुसरीत शिकणाऱ्या मुलींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार 


विक्रोळीतील टागोर नगरमधील महापालिकेच्या शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला. टागोर नगरमधील पब्लिक हायस्कूल या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरी इयत्तेत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली शिक्षक हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती.त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे.


आरोपी शिक्षकाने ठाण्यातही असाच प्रकार केल्याचं उघड 


दरम्यान या शिक्षकाने ठाण्यातही असा अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पालकांना घरी जावं, अशी विनंती केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानी पोलिसांचाही निषेध केला आहे. तसंच पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


"पोलिसांना या घटनेचं गांभीर्य समजत नाहीये. विक्रोळी पोलीस हा प्रश्न दाबायचा प्रयत्न करत आहेत. पालक इतका गंभीर प्रश्न घेऊन आलेले असताना पोलीस त्यांना घरी जाण्यासाठी सांगत आहेत. मुंबईत अशा घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांना हे प्रकरण दाबून काय मिळणार आहे, असं चेतन अहिरे नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे.


माहिममध्ये मुलीवर अत्याचार करणारा सावत्र पिता अटकेत


आईला जीवे मारण्याची धमकी देत 45 वर्षीय सावत्र पित्याने 18 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुंबईतील माहिममध्ये उघडकीस आली. पोटात दुखू लागल्यानंतर मुलीने संबंधित प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आई आणि मुलीने पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर आरोपी सावत्र पित्यावर आयपीसीच्या कलमांन्वये बलात्कारासह पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून सावत्र पिता तिच्यावर अत्याचार करत असल्याचं समोर आलं आहे. 


हेही वाचा


Mumbai Crime : मुलगा लटकलेल्या अवस्थेत तर आईचा मृतदेह बेडरुममध्ये आढळला, विक्रोळीतील धक्कादायक घटना