नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्ली सप्टेंबर महिन्यात तीन दिवस बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्यातील 8, 9 आणि 10 या तीन तारखांना दिल्लीमध्ये सुटी जाहीर करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यात G 20 देशांची परिषद होणार असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिल्ली सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. दिल्ली पोलिसांनी हा प्रस्ताव दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे दिला होता. त्याला केजरीवाल यांनी मंजुरी दिली आहे.


दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जगातील 20 बलाढ्य देशांच्या प्रमुखांच्या आगमनापूर्वी दिल्ली पोलीसांनी सुरक्षेची सर्व तयारी केली आहे. वाहतूक व्यवस्थापनापासून शाळा-कॉलेजपर्यंत बंदची तयारी करण्यात आली आहे. G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजधानीत 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. या तीन दिवसांत शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुटी असणार आहे. याशिवाय व्हीआयपी मुव्हमेंट असलेल्या ठिकाणच्या वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहेत. दिल्लीकरांना पर्यायी मार्गांची माहितीही पोलीस देतील.


जीवनावश्यक सेवा सुरू 


G-20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थापन आराखड्यानुसार, 7 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून, नवी दिल्ली परिसर आणि इतर प्रतिबंधित किंवा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी वाहतूक नियम लागू केले जातील. या काळात सीमेवरून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, रेशनच्या वस्तू, औषधे आणि पेट्रोलियम पदार्थ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. इतर मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड आणि मध्यम मालाच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र जी वाहने दिल्लीच्या आत आहेत त्यांना दिल्लीबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.


नवी दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हीआयपी मुव्हमेंट होणार असून, या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील सर्व कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठा 8 ते 10 तारखेपर्यंत बंद राहतील. डीटीसी बसेसही नवी दिल्लीला लागून असलेल्या इतर भागातून वळवल्या जातील किंवा बंद केल्या जातील. गाझीपूर, सराय काले खान आणि आनंद विहार येथेही आंतरराज्य बसेस बंद केल्या जातील. गुरुग्रामकडून येणाऱ्या हरियाणा आणि राजस्थानच्या आंतरराज्य बसेसही राजोकरी सीमेवर थांबवल्या जातील किंवा तिथून मेहरौलीच्या दिशेने पाठवल्या जातील.


Delhi Metro News : मेट्रो सेवा मात्र सुरूच राहणार 


या काळात दिल्लीकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांचे विशेष आयुक्त एस.एस. यादव यांनी आवाहन केले आहे की, जी-20 शिखर परिषदेदरम्यान लोकांनी रस्त्याच्या मार्गे प्रवास न करता मेट्रोने प्रवास करावे. विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रुग्णालय अशा ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सुरक्षा व्यवस्थेमुळे, सुप्रीम कोर्ट, खान मार्केट, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय यांसारखी काही मेट्रो स्थानके 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान बंद ठेवली जाऊ शकतात, परंतु इतर सर्व मेट्रो स्थानके खुली राहतील आणि सर्व मार्गांवर मेट्रो धावेल.


ही बातमी वाचा: