India First Mobile Call:  कधीकाळी भारतात महागडी आणि उच्चमध्यमवर्गीयांसाठी समजली जाणारी मोबाईल फोन सेवेला आज 28 वर्षे झाली आहेत. आजच्या दिवशी भारतात पहिला मोबाईल फोन करण्यात ( First Mobile Phone Call) आला. आज मोबाईलवर येणारे काही अंशी कॉल फ्री असले तरी सुरुवातीच्या काळात इनकमिंग आणि आउटगोईंगसाठी पैसे भरावे लागत असे. आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मोबईलचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. भारतातील मोबाईल फोन सेवेच्या या 28 वर्षात मोबाईल फोन सेवा फक्त फोन कॉलसाठी राहिली नसून माहिती मिळवण्याचे साधन, सोशल मीडिया, मनोरंजनाचे साधन म्हणूनही पाहिले जात आहे.


मोबाईल क्रांतीची सुरुवात... 


भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे काम तत्कालीन दूरसंचार मंत्री पंडित सुखराम यांनी केले होते. भारतात सध्या किमान प्रत्येक घरात एक तरी मोबाइलधारक दिसतो. याचे श्रेय पंडित सुखराम यांना जाते. भारतात पहिला मोबाइल कॉलदेखील त्यांनी केला होता. 


जपानमधून भारतात आला मोबाइल फोन


पंडित सुखराम यांनी भारतात मोबाइल सेवा सुरू करण्याचा किस्साही रंजक आहे. पंडित सुखराम हे दूरसंचार मंत्री असताना जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी कार चालकाच्या खिशात मोबाइल फोन पाहिला होता. जपानमध्ये असे तंत्रज्ञान असू शकतं मग, भारतात का नाही? असा विचार त्यांनी केला. त्यानंतर भारतात मोबाइल फोन सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एका जाहीर सभेतही त्यांनी येणाऱ्या काही वर्षात तुमच्या खिशात मोबाइल फोन असेल असे म्हटले. त्यावेळी लोकांनी या वक्तव्याला हसण्यावारी नेले होते. साधा लँडलाइन फोनसाठीदेखील त्यावेळी लोकांना काही महिने प्रतिक्षा करावी लागायची. त्यामुळे मोबाइल फोन कुठून येणार, अशी लोकांनी उपस्थित केलेली शंका योग्यच होती.


भारतातील पहिला मोबाइल कॉल


पंडित सुखराम हे 1993 ते 1996 या काळात दूरसंचार मंत्री होते.  भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिल्यांदा मोबाइल फोनमधून कॉल करण्यात आला होता. हा पहिला मोबाइल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. यासाठी नोकिया कंपनीचा हँडसेट वापरण्यात आला होता. मोबाईल नेटवर्क मोदी टेलस्ट्राची मोबाईलनेट कंपनीचे होते. ही कंपनी भारताच्या बीके मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेलस्ट्रा यांच्यातील संयुक्त उपक्रम होती. कलकत्ता (आता कोलकाता) आणि नवी दिल्ली या दोन ठिकाणा दरम्यान हा पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता.



सुरुवातीचे मोबाईल सेवेचे दर


सुरुवातीला फोन करण्यासाठी 16 रुपये 40 पैसे प्रति मिनीट असे शुल्क आकारण्यात येत होते. इनकमिंग कॉललाी शुल्क लागू होते.  त्यासाठी 8 रुपये 40 पैसे असा दर होता. पहिल्या तीन वर्षांपर्यंत देशातील मोबाईलधारकांची संख्या 8 लाखांपर्यंत पोचली होती. 


‘विदेश संचार निगम लिमिटेड’ने 1995 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांना इंटरनेट सेवेची भेट दिली. ‘व्हीएसएनएल’ने देशात गेटवे इंटरनेट ॲक्‍सेस सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. सुरुवातीच्या टप्प्याता इंटरनेट सेवा चार महानगरांपर्यंतच मर्यादित होती. इंटरनेटसाठी त्या वेळी 250  तासांसाठी पाच हजार रुपये शुल्क होते. खासगी कंपन्यांसाठी हा दर 15 हजार रुपये होता.  सुरुवातीच्या टप्प्यात नोकिया, सिमेन्स, मोटारोला आणि एरिक्सन यांसारख्या कंपन्या मोबाईल हॅण्डसेट तयार करत असे. त्यांचे दरही आजच्या तुलनेत महाग होते.