भारत : कोलकातामधून (Kolkata) शुक्रवार (25 ऑगस्ट) रोजी एका पाकिस्तानी गुप्तहेराला (Pakistani Ajent) अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव भक्ती बंशी झा असं आहे. या तरुणाने हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकून काही संवेदनशील माहिती पाकिस्तानीतील लोकांना पुरवली असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.  तसेच त्याच्याकडून काही संवेदनशील कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीबद्दल पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर हावडा पोलिसांनी त्याच्या राहत्या घरामधून त्याला ताब्यात घेतलं. देशाच्या विरोधातील कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं आहे. 


माहिती पाकिस्तानाला पुरवली


पोलिसांनी काही तास गस्त घातल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान त्याच्या फोनमध्ये काही फोटो, व्हिडीओ आणि ऑनलाईन चॅट्सच्या स्वरुपात काही गुप्त माहिती पोलिसांना आढळून आली. त्याने ही माहिती पाकिस्तानात पुरवली असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. ही व्यक्ती एका कुरिअर सेवा कंपनीमध्ये काम करत होती. तसेच यापूर्वी तो दिल्लीत देखील वास्तव्यास होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपी विरोधात शुक्रवारीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तो मागील तीन महिन्यांपासून कोलकातामध्ये सक्रिय असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कोलकाता पोलिसांच्या एटीएस पथकाने त्याला ताब्यात घेतलं. कोलकाता पोलिसांनी त्याच्या घरातून इतर काही महत्त्वाची कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहे. 


हनीट्रॅपचं प्रकरण


माहितीनुसार, या आरोपीची सोशल मिडियाच्या माध्यमातून एका मुलीशी ओळख झाली. ही मुलगी एक पाकिस्तानी एजंट असल्याचं सांगण्यात येत आहे. तिचं नाव आरुषी शर्मा असं होतं. फेसबुकवर झालेल्या मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर या दोघांमध्ये काही अश्लील संवाद देखील झाले. या मुलीने एका पाकिस्तानी एजंटला आपले वडिल असल्याचं सांगत त्या आरोपीला भारतात भेटण्यास सांगितलं. त्यानंतर या आरोपीने त्या मुलीच्या वडिलांची भेट देखील घेतली आणि त्याला एक सिमकार्ड देखील खरेदी करुन दिले. 


आरोपीनं काय सांगितलं?


या आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, त्या पाकिस्तानी एजंटने आरोपीला सांगितलं की तिची बहिण पत्रकार आहे. ती डिफेन्सचं बीट कव्हर करते. त्यामुळे या आरोपीने त्याच्या फोनमध्ये एक विशेष कॅमेरा डाऊनलोड केला होता. ज्यामुळे तो काही गोष्टींचे फोटो घेऊन त्याचे लोकेशन देखील त्याला मिळत होते. ते फोटो भारतीय सैन्याच्या अनेक जागांचे होते. त्याने हे फोटो त्याच्या एका पाकिस्तानी मित्राला पाठवले असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे. 


यामध्ये आता कोलकाता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. तसेच या आरोपीला आता न्यायालयात देखील हजर केले जाणार आहे. त्यामुळे या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी कोलकाता पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Seema Haider Rakhi : Seema Haider Rakhi : पाकिस्तानी सीमा हैदरने मोदी, शाह आणि योगींना पाठवली राखी; म्हणाली, 'बहिण या नात्याने...'