Meta Blocks News on Facebook and Instagram In Canada: मेटानं एक मोठा निर्णय घेत कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना धक्का दिला आहे. आता कॅनडातील फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्स दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर बातम्या किंवा बातम्यांच्या लिंक पाहू शकणार नाही. 


आजच्या युगात सोशल मीडिया (Social Media) लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक दिवसातील अनेक तास सोशल मीडियावर गुंतलेले असतात. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही तर माहितीसाठीही होऊ शकतो. जगभरातील अनेक लोक सोशल मीडियाचा वापर फक्त बातम्यांसाठी करतात. इंटरनेटच्या या जगात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म बातम्या युजर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, अशातच मेटाच्या निर्णयामुळे कॅनडातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सना धक्का बसणार आहे.


कॅनडामधील युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या पाहू शकणार नाहीत


नुकताच मेटानं मोठा निर्णय घेतला असून, कॅनडातील सोशल मीडिया युजर्सना मेटाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. मेटाच्या निर्णयानुसार, कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्स यापुढे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या पाहू शकणार नाहीत. मेटानं कॅनडामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्याही ब्लॉक केल्या आहेत.


मेटानं कॅनडात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागतील, या कायद्याचा निषेध म्हणून मेटाने हा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम फेसबुक, गुगल आणि ट्विटरसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना लागू होणार आहे. गुगलनंही असाच इशारा दिला आहे.


मेटानं एका निवेदनात म्हटलं आहे की, प्रकाशकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. आता बातम्यांच्या लिंक कॅनडातील कोणत्याही युजर्सना पाहता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मेटानं आपल्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बातम्यांचं शेअरिंगही बंद केलं आहे. मेटाचं म्हणणं आहे की, बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली आहे. हे पुढचे अनेक आठवडे सुरुच राहिल. दरम्यान, AFP च्या एका रिपोर्टरनं फेसबुकवर न्यूज पाहिल्याचा दावा केला आहे. पण अनेक युजर्सनी बातम्यांच्या लिंक दिसतच नसल्याचाही दावा केला आहे.