(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार डॉ.मिलिंद बोकील यांना जाहीर
Anant Bhalerao Award 2023 : येत्या 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या रचनात्मक कार्यामध्ये कृतिशील योगदान देणारे ज्येष्ठ लेखक, संपादक डॉ.मिलिंद बोकील यांना यंदाच्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 50 हजार रुपये असे स्वरूप असलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना येत्या 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार्या विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. याबाबत अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील ध्येयवादी संपादक अनंत भालेराव यांच्या स्मरणार्थ मागील तीन दशकांपासून देण्यात येणार्या पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकारिता व अन्य क्षेत्रांतील नामवंतांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ.बोकील यांचे नाव प्रतिष्ठानने एकमताने निश्चित केले. यासंदर्भात मधुकरअण्णा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे झालेल्या बैठकीस न्या.नरेन्द्र चपळगावकर, डॉ.सुधीर रसाळ, डॉ.प्रभाकर पानट, राधाकृष्ण मुळी, संजीव कुळकर्णी, डॉ.मंगेश पानट, प्रा.सुनीता धारवाडकर, हेमंत मिरखेलकर व डॉ.सविता पानट उपस्थित होते.
कोण आहेत डॉ.मिलिंद बोकील?
डॉ.बोकील हे महाराष्ट्रातील जाणत्या वाचकांना कथाकार व कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. आरंभीच्या काळात कथा आणि लघुकादंबर्यांच्या माध्यमातून समोर आलेल्या या प्रयोगशील लेखकाची पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांच्या जीवनाचे चित्रण करणारी ‘शाळा’ ही कादंबरी विख्यात असून या कादंबरीवर आधारलेल्या मराठी चित्रपटास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. ‘गवत्या’ ही त्यांची कादंबरीही वाचकप्रिय ठरली. ललित लेखनासोबतच त्यांनी राजकीय व वैचारिक लेखनातूनही आपली ओळख ठळक केली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाचा त्यांच्यावर तरुण वयातच प्रभाव पडला. त्यातून बोकील यांच्या ध्येयवादी व समाजभान जपणार्या आयुष्याची जडणघडण होत गेली. वयाची साठी पार केल्यानंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दरम्यान त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
असा असणार पुरस्कार...
अनंत भालेराव यांच्या स्मरणार्थ मागील तीन दशकांपासून अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने विशेष पुरस्कार देण्यात येते. महाराष्ट्रातील पत्रकारिता व अन्य क्षेत्रांतील नामवंतांना हे पुरस्कार देण्यात येते. यावेळी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 50 हजार रुपये असे स्वरूप असते.
यापूर्वी पुरस्कार जाहीर झालेले नावं
गिरीश कुबेर, अनिल अवचट, आप्पा जळगावकर, अभय बंग, अरुण टिकेकर, कुमार केतकर, थोर गांधीवादी, गंगाप्रसादजी अग्रवाल, ग.प्र.प्रधान, गोविंद तळवलकर, चंद्रकांत कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ द.ना. धनागरे, नरेंद्र दाभोलकर, ना.धों.महानोर, पी. साईनाथ, पुष्पा भावे, मंगेश पाडगावकर, महेश एलकुंचवार, मृणाल गोरे, मेधा पाटकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, वसंत पळशीकर, विजय तेंडूलकर, शशिकांत अहंकारी, डाॅ. सुधीर रसाळ
इतर महत्वाच्या बातम्या: