ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण आठ दिवसांत जेलमध्ये जाणार; शिंदे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी
Aurangabad : शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद: मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. दरम्यान, आता याच प्रकरणात ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण जेलमध्ये जाणार असल्याची भविष्यवाणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पुढील आठ दिवसांत होणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यावरुन सत्ताधारी पक्ष ठाकरे गटावर आरोप करताना देखील पाहायला मिळत आहे. अशातच संजय शिरसाट यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार आणि मुंबईतील रस्ते घोटाळ्यात ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण जेलमध्ये जाणार आहे. ईडीकडून पुढील आठ दिवसात ही कारवाई होऊ शकते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
650 ची बॉडी बॅग साडेसात हजारात घेतली...
दरम्यान याचवेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, कोविड सेंटर घोटाळ्यात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा प्रकार हा फक्त छोटासा भाग आहे. यात अनेक असे प्रकरण असून, त्यात मागे चौकशी देखील झाली. यात जे 16 ते 17 कंत्राटदार आहेत त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला आहे. मग ते कंत्राटदार कोणाचे होते, त्यांना कोणी विना टेंडर कंत्राट टेंडर दिले. साडेसहा शे रुपयांची बॉडी बॅग तब्बल साडेसात हजारात विकत घेण्यात आली. त्यामुळे, या प्रकरणात ईडीने चौकशी सुरु केली आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं आली आहे. पण, यावर पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने अधिकृतरीत्या यावर प्रतिकिया दिली नाही. तसेच हे चुकीचं असल्याचं देखील कोणी म्हटले नसल्याचं, शिरसाट म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात, हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते पुण्याच्या कार्यक्रमात गेले नाहीत. त्यांची काळजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे काहीही असलं तरीही तुम्ही दोन किंवा तीन दिवस हॉस्पिटलमध्ये जा अशी त्यांना विनंती करणार असल्याचे शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
