(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Talathi Bharti : पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र; गोंधळ संपता संपेना
Talathi Bharti : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यात तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti) परीक्षा सुरू असून, या परीक्षेतील विघ्न काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये (Nashik) तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यावर, आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत (Aurangabad) अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली असून, यासाठी महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरती केली जात आहे. ज्यात भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात परीक्षार्थीचे परीक्षा केंद्रच कुठेच्या कुठे आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेच नसल्याचा आरोप होत आहे. औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चक्क नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र् देण्यात आले आहे. तर पुण्यातील विद्यार्थ्यांना औरंगाबादमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
रिटर्न तिकीट रद्द होणार, विद्यार्थ्यांवर खर्चाचा बोजा
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर,नाशिक शहरात राहून परीक्षेची तयारी करणाऱ्या हे विद्यार्थी मोजक्याच पैशात दिवस काढतात. त्यात आजच्या तलाठी परीक्षेसाठी कुठेच्या कुठे परीक्षा केंद्र आल्याने अनेकांनी पैश्याची बचतीसाठी रिटर्नचे तिकीट देखील काढले होते. मात्र, 9 वाजता सुरु होणारी परीक्षा 11 वाजेपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे रिटर्नचे तिकीट रद्द होणार आहे. त्यामुळे त्यांना परत जातांना पुन्हा तिकीट काढावे लागणार आहे. रूपा-रुपयांची पदरमोड करून हे विद्यार्थी दिवस काढत असतात. त्यामुळे आजच्या भोंगळ कारभाराचा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे.
आता कोणावर कारवाई करणार?
राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत केंद्रावर येणाऱ्या विध्यार्थ्यांना वेळेत हजर राहण्याचे निर्देश दिले जातात. तसेच एक मिनटांचा उशीर झाल्यावर त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात नाही. मात्र, आता तलाठी परीक्षा केंद्रावर चक्क दोन तास उशिरा परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाई करणार असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे. तसेच मुलांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असाही प्रश्न विचारला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेत मोठं विघ्न, सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो परीक्षार्थी खोळंबले