Marathwada Rain Update : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात
Heavy Rain in Marathwada : शुक्रवारी (21 जुलै) रोजी सकाळी साडेदहापूर्वीच्या गेल्या चोवीस तासांत 40 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.
Heavy Rain in Marathwada : गेल्या तीन चार दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी देखील विभागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडतांना पाहायला मिळाले. तर मराठवाड्याच्या विविध भागांत यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 27 मंडळांमध्ये दोनदा तर दोन मंडळांमध्ये तीनदा 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक अतिवृष्टी नांदेड (Nanded) जिल्ह्यात झाली असून, नांदेडमधील तब्बल 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर शुक्रवारी (21 जुलै) रोजी सकाळी साडेदहापूर्वीच्या गेल्या चोवीस तासांत 40 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.
यावर्षी मान्सून उशिराच दाखल झाला असून, जून महिना कोरडा गेला आहे. त्यात पावसाचा दुसरा महिना म्हणजेच जुलै महिना संपत आला आहे. सुरुवातीला जो काही पाऊस झाला त्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. दरम्यान मराठवाड्यात जूनपासून आतापर्यंत 229.8 मिलिमीटर पाऊस झालेला आहे, आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
- नांदेड : जिल्ह्यात आतापर्यंत 327.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
- बीड : मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस बीड जिल्ह्यात झाला असून, बीडमध्ये 174.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- हिंगोली : जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोलीत 277 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- लातूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असून, आतापर्यंत लातूरमध्ये 241.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसून, आतापर्यंत 202.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- जालना : जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा काय असून, आतापर्यंत 204.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- धाराशिव : जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा असून, जिल्ह्यात 41 प्रकल्प कोरडे पडले आहे. तर धाराशिव जिल्ह्यात 168 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत 208.1 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
148 मंडळांत अतिवृष्टी
मागील 24 तासांत 65 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर ती अतिवृष्टी मानली जाते. एक जूनपासून 21 जुलैदरम्यान आठ जिल्ह्यातील 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वांत जास्त अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तर हिंगोलीत 15, परभणीत 14 मंडळांत, छत्रपती संभाजीनगर 12, जालना 4, बीड 10, लातूर 13 तर धाराशिव जिल्ह्यात 6 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jalna Rain Update : जालना जिल्ह्याला आज 'यलो अलर्ट'; विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता