Breaking News: मराठा आरक्षण समिती आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार बैठक
Maratha Reservation : मराठवाड्यात येणारी मराठा आरक्षण समिती पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहे.
Maratha Reservation : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती आजपासून मराठवाड्याच्या (Marathwada) दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. तसेच स्थानिक प्रशासने आतापर्यंत शोधलेल्या कुणबी नोंदीचा देखील आढावा घेतल्या जाण्याच्या शक्यता आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन देखील या समितीच्या वतीने करण्यात आला आहे. मराठवाड्यात येणारी मराठा आरक्षण समिती पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहे.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागाचा (मराठवाडा) जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात यापूर्वीच विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले होते.
नागरिकांकडून उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांची पाहणी करणार...
मराठा आरक्षण समितीच्या आजपासूनच्या दौऱ्यात समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांकडून उपलब्ध होणाऱ्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. दस्तावेजाची समिती पाहणी करणार असून, त्याच्या नोंदी घेणार आहे.
समितीच्या बैठकीचे वेळापत्रक
- समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे.
- जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
- परभणी येथे 16 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता समितीची बैठक होणार आहे.
- हिंगोली येथे 17 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- नांदेड येथे 18 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता ही बैठक होणार आहे.
- लातूर येथे 21 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता बैठक होईल.
- धाराशिव येथे 22 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- बीड येथे 23 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.
जरांगेंच्या सभांचा धडका सुरूच...
एकीकडे मराठा आरक्षण समिती मराठवाड्याचा दौरा करत असून, दुसरीकडे सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 40 दिवसांची मुदत देणारे मनोज जरांगे यांचा राज्यभरात सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. सरकारला देण्यात आलेल्या मुदतीला 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी गावात भव्य सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेचं आमंत्रण देण्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजासोबत संवाद साधण्यासाठी जरांगे यांच्याकडून राज्याचा दौरा केला जात आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात ठिकठिकाणी होणाऱ्या त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: