मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या सभेच बॅनर फाडले; घोषणाबाजीही केली
Maratha Protestors : वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या अजय साळुंके नावच्या व्यक्तीने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पुन्हा मराठा आंदोलक (Maratha Protestors) आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची उद्या होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केले जाऊ देत नाही. त्यामुळे आमच्या गावात देखील बॅनर लावतांना ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी अन्यथा बॅनर लावू देणार नाही असे म्हणत मराठा आंदोलकाने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात लावण्यात आलेल्या अमित शाह यांचे बॅनर फाडण्यात आले आहे. अमित शाह यांची उद्या छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. त्यासाठी जिल्हाभरात बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या अजय साळुंके नावच्या व्यक्तीने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहेत. मराठा आरक्षणासाठी गाव बंदीचे बॅनर तुम्ही अनाधिकृत आहेत म्हणून काढता, मग आमच्या गावात लावलेलं हे बॅनर कुठल्या परवानगीने लावले आहेत असं म्हणत बॅनर फाडण्यात आले आहे.
घोषणाबाजी देखील केली?
वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात लावण्यात आलेल्या अमित शाह यांचे बॅनर फाडण्यात आले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या. 'आम्हाला उपोषणाल बसायचं असेल, आंदोलन करायचं असेल त्यावेळी परवानगी घ्यावी लागते. त्या-त्या कार्यालयाला निवेदन द्यावे लागतात. मग आमच्या गावात जर तुम्हाला बॅनर लावायचा असेल तर तुम्ही आमच्या गावातील ग्रामपंचायतची परवानगी घ्या, असे मराठा आंदोलक म्हणाले. परवानगी घेतली नसेल तर आम्ही तुमचे बॅनर लावू देणार नाही असेही आंदोलक म्हणाले.
संभाजीनगर शहरात जाहीर सभा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले असून, महत्वाच्या नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला होता. आता अमित शाह महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे उद्या 5 मार्च रोजी अमित शाह हे संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेत आहेत. विशेष म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर महायुतीत भाजपकडून देखील दावा केला जात आहे. त्यामुळे उद्या होणारी अमित शाह यांची सभा महत्वाची समजली जात आहे.
सभेची तयारी पूर्ण...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सभा होत आहे. या सभेची तयारी भाजपाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरक्षेचा आढावा देखील घेतला आहे. या सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहतील.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! अमित शाह आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; संभाजीनगरात जाहीर सभा